Vidyanand Bapat : विद्यानंद बापट निवडणूक लढवणार का? असीम सरोदे यांची पोस्ट चर्चेत
Vidyanand Bapat : डीजे बंदीसाठी आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आता चांगली प्रसिद्धी, ओळख मिळाली आहे. आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? राजकारणात प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्याचं कारण आहे असीम सरोदे यांची पोस्ट.

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे. महायुतीकडून या निवडणुकीची तयारी सुरु आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातून निवडून येणाऱ्या उमेदवाराला विधान परिषदेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे. या निवडणुकीसाठी आता डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याच कारण आहे असीम सरोदे यांची एक्स पोस्ट. प्रसिद्ध वकिल असीम सरोदे यांनी एक्सवर पोस्ट करुन विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का? असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे विद्यानंद बापट यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. असीम सरोदे यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हटलय? ते जाणून घेऊया.
“माझ्यासोबत उभ्या असलेल्या व्यक्तीचा आता खूप परिचय देण्याची आवश्यकता उरली नाही. ध्वनिप्रदूषणाच्या राक्षस विरोधात निर्भयपणे उभा असणारा ‘विद्यानंद बापट’. अनेकांच्या मनातील दुःख बोलणारा आणि उत्सवांचे विकृत स्वरूप, त्यातील ओंगळवाणेपणा चव्हाट्यावर आणणारा हिरो ठरला आहे. तर विद्याविभूषित, सुसंकृत, विनम्र, अभ्यासू, प्रत्येक सामाजिक प्रश्नांची जाणीव असणारा विद्यानंद बापट आज जणू प्रत्येक घरातील आपुलकीचा सदस्य झालेला आहे. भाषेचा स्तर बिघडू न देता,
विषयाला धरून बोलणारा आणि समाजाला वैश्विक बनविण्याची क्षमता असणाऱ्या विद्यानंद बापटने पदवीधर मतदारांमधून निवडणूक लढवावी का?” असं असीम सरोदे यांनी विचारलं आहे.
हल्ला सुद्धा झाला
विद्यानंद बापट यांनी पुण्यात गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकतील डीजेच्य दणदणाटाविरोधात आवाज उठवला. त्यासाठी त्यांच्यावर हल्ला सुद्धा झाला. पण त्यामुळे महाराष्ट्रात डीजे दणदणाटाविरुद्ध जागरुकता निर्माण झाली. विद्यानंद बापट यांचं मराठी भाषेवरील प्रभुत्वदेखील चर्चेचा विषय बनलं आहे.
लाऊडस्पीकरबद्दल विद्यानंद बापट यांचे विचार काय?
“लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे. खुल्या वातावरणील लाऊडस्पीकरवर बंदी आणली पाहिजे. खरंतर ही समस्या मूळापासून सोडवली पाहिजे. खुल्या वातावरणात लाऊडस्पीकर वाजवण्याची परवानगी दिल्यानंतर नैतिक अधिकार फारसा राहत नाही. सणांच्या दिवसात अंमलबजावणीत शिथिलता येते. त्यामुळे पोलिसांनी स्वत:हून कारवाई करणे गरेजेचे आहे.त्यांनी आधीच रोखण्याची योजना आखली पाहिजे” असं विद्यानंद बापट यांचं मत आहे.