Pune Anand Dave : सरसकट भोंगे बंद केले तर हिंदुंच्या सणांवरही संक्रांत! राज ठाकरेंनी वक्तव्याचा पुनर्विचार करावा, नेमकं काय म्हणाले आनंद दवे?

| Updated on: May 02, 2022 | 10:17 AM

नमाज एका मर्यादेपर्यंत किंवा दिवसापुरते मर्यादित असते. मात्र आपले सण वर्षभर होत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली वक्तव्ये पाहून त्याचा पुनर्विचार व्हावा, असे आनंद दवे यांचे म्हणणे आहे.

Pune Anand Dave : सरसकट भोंगे बंद केले तर हिंदुंच्या सणांवरही संक्रांत! राज ठाकरेंनी वक्तव्याचा पुनर्विचार करावा, नेमकं काय म्हणाले आनंद दवे?
राज ठाकरेंच्या भूमिकेवर मत व्यक्त करताना आनंद दवे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : लाउडस्पीकर (Loudspeaker) खाली आलेच पाहिजेत, पण मग हिंदू उत्सवातल्या स्पीकरचे काय करणार, असा सवाल करत भोंगे उतरवणे वंदनीय बाळासाहेबांच्या काळातसुद्धा शक्य झाले नव्हते, असे मत हिंदू महासभेचे आनंद दवे (Anand Dave) यांनी मांडले आहे. ते पुण्यात बोलत होते. राज ठाकरे यांनी भोंगे उतरवण्यासंबंधीची भूमिका मांडली आहे. भोंग्यांचा विषय सामाजिक असून मशिदींवरचे आणि सर्वच ठिकाणांवरचे भोंगे उतरवलेच पाहिजेत, असे ते म्हणाले होते. एवढेच नाही, तर आधी मशिदींवरचे भोंगे उतरवा नंतर मंदिरावरचे उतरवू, अशी भूमिका त्यांनी मांडली होती, त्यावर आनंद दवे यांनी आपले मत मांडले आहे. भोंगे उतरवण्याने सर्वाधिक नुकसान हिंदुत्वाचे (Hindutva) होईल, असे ते म्हणाले आहेत. दरम्यान, आमची भूमिका 3 तारखेला नगर मेळाव्यात मांडू, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

‘हिंदुंवरच जास्त अन्याय’

प्रत्येक गावाची जत्रा, उरूस, ग्रामदैवत यात्रा, गणपतीची मिरवणूक यासहित 12 दिवस, नवरात्रीचे 10, शिवजयंती, संभाजी महाराज जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, प्रत्येक जातीच्या युगपुरुषांचे दिवस, त्यासंबंधीच्या यात्रा, पाडवा यात्रा, दिवाळी पहाट, दहीहंडी हे सगळेच संकटात येईल, असे दवे म्हणाले. रस्त्यावर नमाज पठण चूकच मग गणपती मंदिर, मांडव, उत्सव, मांडवातील आरती त्याचबरोबच रस्त्यावरील मिरवणूक, दांडिया यांचे काय करणार, असा सवाल त्यांनी केला आहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाने देशात हिंदुंवरच जास्त अन्याय होत असल्याचेही आनंद दवे यांचे म्हणणे आहे.

‘आपल्या वक्तव्यांचा पुनर्विचार करावा’

मुस्लिमांना उद्देशून वक्तव्य करताना राज ठाकरे म्हणाले होते, की तुम्ही तुमचे भोंगे बंद करा, मग आम्ही आमचे करू. मात्र आपल्याकडे वर्षभर सण, उत्सव असतात. त्याठिकाणी धार्मिक विधी आणि लाउडस्पीकर असतात. हे सर्व संकटात येवू शकते. ते बंद करतात म्हणून आपले सण, परंपरा आपण बंद करणे योग्य ठरेल का, असा सवाल दवे यांनी केला आहे. नमाज एका मर्यादेपर्यंत किंवा दिवसापुरते मर्यादित असते. मात्र आपले सण वर्षभर होत असतात. त्यामुळे राज ठाकरे यांनी आपली वक्तव्ये पाहून त्याचा पुनर्विचार व्हावा, असे त्यांचे म्हणणे आहे.