
पुणे | 14 सप्टेंबर 2023 : पुणे शहराचा विकास वेगाने होत आहे. पुणे शहरात आधी मोठ, मोठे उद्योग उभारले गेले. त्यानंतर आता माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या येऊ लागल्या. त्यामुळे पुणे शहरात नोकरीसाठी अनेक जण येत आहे. त्याचा परिणाम नवीन फ्लॅट खरेदीवर झाला आहे. पुणे शहरात आणि उपनगरमध्ये अनेक बिल्डरांनी आपले प्रकल्प उभे केले आहेत. या प्रकल्पांमध्ये मागणी वाढत आहे. गेल्या सहा महिन्यांत फ्लॅटची विक्री दुप्पट झाली आहे. देशात सर्वाधिक मागणी पुणे शहरात फ्लॅटला येत आहे. पुण्यात फ्लॅटची विक्री वाढत असताना आता उंच टॉवर उभारण्याकडे कल वाढत आहे.
पुणे शहरात आता गगनचुंबी इमारती उभारण्याकडे कल सुरु झाली आहे. यापूर्वी राज्यात मुंबईतच गंगनचुंबी इमारती उभारल्या जात होत्या. परंतु आता पुण्यात 100 मीटरच्या इमारती तयार करण्याचे प्रस्ताव वाढत आहे. 2022-23 मध्ये उंच इमारतीचे 17 प्रस्ताव आले आहे. तसेच 10 प्रस्ताव प्रक्रियेत आहेत. पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले की, मागील वर्षांपेक्षा या वर्षी उंच इमारत उभारण्याचे प्रस्ताव अधिक आले आहे. यामुळे शहराचा विकास आता व्हर्टीकल होणार आहे. पुणे मनपाकडून या प्रस्तावांना मंजुरी दिली जात आहे.
पुणे मनपाकडून उंच इमारतींचे प्रस्ताव मंजूर करताना सुरक्षा, स्ट्रक्चरल डिझाइन आणि तंत्रज्ञान या पद्धतीची चिकित्सा करुन मंजूर केले जात आहे. त्यात स्ट्रक्चर डिझाइनचे प्रमाणपत्र, भूगर्भ शास्त्रज्ञांचा अहवाल, मॅकनिकल इलेक्ट्रीकल प्लबिंग रिपोर्ट याची तपासणी केली जाते. तसेच विविध विभागाकडून आलेले ना हरकत प्रमाणपत्रे तपासले जातात. ही सर्व कागदपत्रे उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीसमोर जातात. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यावर उंच इमारतींचे प्रस्ताव मान्य केले जातात.
पुण्यात उंच इमारतीसाठी यापूर्वी 70 मीटरची मर्यादा होती. आता ती 100 मीटरची करण्यात आली आहे. पुणे मनपाकडे आलेल्या 17 प्रस्तावांपैकी सर्वाधिक 9 प्रस्ताव बाणेरमधून आले आहे. चार बिबेवाडी, तीन गुलटेकडी आणि एरंडवणा या भागातील आहेत. यासंदर्भात दहा प्रस्ताव अजून प्रलंबित आहे.