Ganesh Visarjan: आम्ही इथं एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात तुफान राडा, पोलिसांना न जुमानता डीजे वाजवलाच, Video तुफान व्हायरल

Pune Ganesh Visarjan DJ 2026: पुण्यात अतिउत्साही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सर्व नियमांची ऐशीतैशी केल्याचे गणेश विसर्जन मिरवणुकीत दिसले. अलका चौकात तर पोलिसांनाच कार्यकर्त्यांनी आव्हान दिले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आवाहनाला न जुमनता डीजेवर ताल धरला आणि पोलीस बघतच राहिले

Ganesh Visarjan: आम्ही इथं एक गाणं वाजवणारचं! पुण्यातील अलका चौकात तुफान राडा, पोलिसांना न जुमानता डीजे वाजवलाच, Video तुफान व्हायरल
पुण्यात अलका चौकात पोलिसांसमोरचा तुफान राडा
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Sep 27, 2026 | 10:40 AM

Pune DJ Ganesh Visarjan 2026: राज्यात ‘डीजे’च्या दणदणाटाविरोधात पुण्यातून पहिला हुंकार आला. पोलिसांनीही डीजेवर बंदीची घोषणा केली. सर्व यंत्रणा कामाला लागल्या. पण सांस्कृतिक पुण्यात यंदा डीजेच्या दणदणाटाने कानठळ्या बसवल्या. अलका चौकात जो काही मंडळाच्या कार्यकर्त्यांना राडा घातला, त्यामुळे पुणेकरांच्या कानातून रक्त तेवढं बाहेर यायचं बाकी ठेवलं. अलका चौकात डीजेच्या आवाजाने उच्चांक गाठला. आम्हाला या चौकातच डीजे वाजवायचा, एक गाणं वाजवल्याशिवाय आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेत कार्यकर्त्यांनी पोलिसांची दमकोंडी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत डीजेवर ताल धरला आणि पोलीस बघतच राहिले.

ज्या चौकात बंदी, तिथेच दणदणाट

शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या आणि मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. शनिवारी संध्याकाळपर्यंत विसर्जन मिरवणूक सुरू होती. पुण्यनगरीतील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख रस्त्यावरून अलका टॉकीज चौकात विसर्जन मिरवणुकींचा संगम होत होता. हे दृश्य मनोहारी आणि विहंगम होते. अलका टॉकीज रस्त्यातच सर्व गणपतींचे दर्शन होत असल्याने इथं तोबा गर्दी जमली होती. विशेष म्हणजे पोलिसांनी अलका टॉकीज चौकात डीजेवर बंदी घातली होती. पण काही गणेश मंडळांनी अलका चौकात येताच पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजवलाच. पोलिसांची बघ्याची भूमिका घेऊन भाविकांनी संताप व्यक्त केला. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

त्या व्हायरल व्हिडिओत काय?

तर सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुका अलका टॉकीज चौकातून विसर्जनासाठी पुढे जात होत्या. त्यावेळी या चौकात एका मंडळाच्या कार्यकर्त्याने डीजेवर एक गाणं वाजवण्याची आग्रही मागणी रेटलीच. पोलिसांनी त्याला पुढे जाण्याचा इशारा केला. पण पेटलेला कार्यकर्ता काही शांत होईना. त्याला बापटांची कोण बोचणी लागली होती, तेच कळेना. पोलिसांना आव्हान देत हा कार्यकर्ता माईक हातात घेऊन ईरेला पेटलेला दिसला. आम्ही एक गाणं वाजवणारच अन इथंच वाजवणार असा त्याचा सूर होता.

त्याने आदेश देताच अवाढव्य असा डीजे खणखणानू लागला. खाली भाविकांची, कार्यकर्त्यांची गर्दी, नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त आणि ‘डोकं फिरलंया’ या गाण्यावर DJ चा दणदणाट सुरू झाला. कार्यकर्ते डीजेच्या वाहनावरच नाचू लागले. तर रस्त्यावर काहींनी ठेका धरला. या गोंगाटामुळे भाविक भक्तांचे डोके फिरले, पण पोलिसांचं डोकं काही फिरलं नाही, म्हणजे त्यांना तात्काळ काहीच कारवाई केली नाही. पोलिस बापुडे हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले आणि सहन करत राहिले. ज्या चौकात बंदी, त्याच चौकात दणदणाट झाला. कार्यकर्त्यांना आवाजाची झिंग चढली. पोलिसांना सबुरीनं घ्यावं लागलं. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डीजेच्या आवाजाचा त्रास नको म्हणून स्वतःच्या कानावर मात्र साऊंडप्रुफ हेडफोन बसवले होते. पण रस्त्यावरील भक्त आणि भाविकांच्या कानावर गोंगाट आदळत होता.

विसर्जन मिरवणुक अधिकच दणदणाट, सरासरी १०४.५ डेसिबलची नोंद

गेल्या महिन्याभरापासून उत्सवातील दोन्ही प्रदूषण विरोधी चळवळीला बळ मिळाले असले तरी यंदा विसर्जन मिरवणुकीत उच्चांकी ध्वनी पातळी नोंदवली गेली. लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात घेतलेल्या नोंदीतून सरासरी १०४.५ डेसिबल ध्वनी पातळीची नोंद झाली असून गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा ध्वनी पातळी मध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us