Pune Graduate Election: पुणे पदवीधरच्या मतमोजणीवेळी मोठा गोंधळ, पेन, कागद नेण्यास मज्जाव केल्याने संताप, प्रभाकर देशमुख कुणाकडे तक्रार करणार?
Maharashtra Vidhan Parishad Election Result 2026: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच मोठा गोंधळ उडाला. मतमोजणी केंद्रात पेन आणि कागद नेण्यास मज्जाव केल्यानंतर वाद निर्माण झाला. काय आहे अपडेट?

Pune Graduate Constituency Election Result 2026: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच मोठा गोंधळ निर्माण झाला. मतमोजणी केंद्रात पेन आणि कागद नेण्यास पोलिसांनी मज्जाव केल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचे वडील प्रभाकर देशमुख आणि पोलिसांमध्ये वाद झाला. पोलिसांच्या या धोरणावर देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली. राज्यातील इतर ठिकाणीही वादाचे प्रसंग आणि नाराजी दिसून आली. सकाळी 8 वाजताच मतमोजणीला सुरुवात झाली असून काही वेळाने निकाल येण्यास सुरूवात होईल.
प्रभाकर देशमुख आणि पोलिसांचा वाद
पोलीस आतमध्ये पेन आणि कागद घेऊन जाऊ देत नाही. मग आम्ही मतमोजणी नेमकी कशी करायची असा सवाल प्रभाकर देशमुख यांनी केला. पोलीस उमेदवार प्रतिनिधींना सहकार्य करत नसल्याची तक्रार त्यांनी केली. यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असे प्रभाकर देशमुख म्हणाले. याप्रकरणी निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करून याची दखल घेण्याची मागणी त्यांनी केली. प्रभाकर देशमुख हे पुणे पदवीधर मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांचे वडील आहेत.
मतपेट्यांवरूनही वाद, उमेदवाराची हरकत
हर्षदा देशमुख यांचे काही प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल झाले. त्यानंतर त्यांना मतपेट्या दाखवण्यात आल्या. त्यातील काही मतपेट्यांच्या सील केलेल्या तारा तुटल्याचे लक्षात आले. त्यांनी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाने त्याचा व्हिडिओ दाखवला जाईल असे स्पष्ट केले. तर देशमुख यांच्याकडून सील तुटलेल्या मतपेट्या बाजूला ठेवत उर्वरित पेट्याची मोजणी करण्याची मागणी करण्यात आली. अनेक मतपेट्या सील नसल्याचा आरोप करण्यात आला. यावरून मतमोजणी केंद्रावर काही काळ तणाव निर्माण झाला होता. सील असलेल्या मतपेट्यांची अगोदर मोजणी करण्याची मागणी करण्यात आली.
अमरावती विभाग शिक्षक निवडणूक मतमोजणी अपडेट्स
25-25 मतपत्रिकांचे पहिल्या फेरीचे गठ्ठे तयार झाले आहेत. आता दुसर्या फेरीला सुरुवात झाली आहे. त्यामध्ये 14 मत पेटी मधील मतपत्रिका काढून गठ्ठे लावले जाणार आहेत. एकूण सहा फेऱ्या होणार त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल.