हर्षवर्धन जाधवांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांचा दानवेंवर आरोप!

| Updated on: Dec 16, 2020 | 1:36 PM

जिल्हा सत्र न्यायालयाने हर्षवर्धन जाधव यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान जाधव यांनी आपल्याला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचा आरोप केला.

हर्षवर्धन जाधवांना 2 दिवसांची पोलीस कोठडी, वकिलांचा दानवेंवर आरोप!
Follow us on

पुणे: कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना 2 दिवसांची म्हणजे 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने हा आदेश दिलाय. 18 डिसेंबरला पुन्हा या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अजय अमन चड्डा यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल केला होता. त्यानंतर मंगळवारी रात्री जाधव यांना अटक करण्यात आली होती. (Harshvardhan Jadhav remanded in police custody for two days)

हर्षवर्धन जाधव यांना आज पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात हजर केलं. त्यावेळी जिल्हा सत्र न्यायालयाने जाधव यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सुनावणीदरम्यान जाधव यांनी आपल्याला राजकीय हेतूने अटक करण्यात आल्याचा आरोप केला. कॅन्टॉन्मेंट बोर्डातील नगरसेवक अमन चड्डा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप जाधव यांनी केलाय.

जाधवांच्या वकिलांचा दानवेंवर आरोप

हर्षवर्धन जाधव यांच्या वकिलांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप केलाय. जाधव यांच्या अटकेमागे दानवेंचा हात आहे. हर्षवर्धन जाधव हे दानवेंचे जावई आहेत. जाधव आणि दानवे यांच्यातील वाद सर्वश्रृत आहे. त्यामुळे राजकीय हेतूने ही कारवाई झाल्याचा आरोप जाधव यांच्या वकिलांनी केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासह इषा झा यांच्याविरोधातही खूनाचा गुन्हा दाखल आहे. अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील चतुश्नृंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमन चड्डा यांनी आपल्या तक्रारीत त्यांचे आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

तक्रारीत म्हटलं आहे, “पुण्यातील औंध भागातून माझे आईवडील दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या गाडीचा दरवाजा उघडल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली. वडिलांचेही नुकतेच एन्जीओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झालेले आहे. हे सांगूनही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या छातीवर बुक्क्या व लाथांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.”

“हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असलेली महिला इषा झा यांनीही जाधव यांच्यासोबत संगनमत करुन शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांच्या पोटामध्ये आणि छातीवर लाथाबुक्क्या मारल्या. आईलाही ढकलून दिलं. आईच्या पायावर लाथ मारुन तिला ढकलून दिले. यामुळे तिच्या पायालाही गंभीर दुखापत केली,” असंही या तक्रारीत म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

हर्षवर्धन जाधवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता

रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत, जावयाचा सासऱ्यावर गंभीर आरोप

Harshvardhan Jadhav remanded in police custody for two days