मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा, महापौर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र

| Updated on: Nov 08, 2021 | 9:06 AM

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पुणेकरांना विशेष आवाहन केलंय. मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नकोत. पुण्यात रक्ताचा तुटवडा आहे. कृपया आपण रक्तदान करुन मला शुभेच्छा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नको, पुण्यात रक्ताचा तुटवडा, रक्तदान करा, महापौर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र
Follow us on

पुणे : पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ त्यांच्या सामाजिक कामांनी आणि लोकोपयोगी भूमिकांनी सतत चर्चेत असतात. कोरोना काळात खुद्द भारताच्या पंतप्रधानांनी त्यांचं कौतुक केलं. आता पुन्हा एकदा त्यांच्या नव्या आवाहनाने त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पुणेकरांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी पुणेकरांना विशेष आवाहन केलंय. मला वाढदिवसाला हारतुरे, केक, भेटवस्तू नकोत. पुण्यात रक्ताचा तुटवडा आहे. कृपया आपण रक्तदान करुन मला शुभेच्छा द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय.

महापौर मोहोळ यांच्याकडून पुणेकरांना रक्तदान करण्याचं आवाहन

महापौर मुरलीधर मोहोळ उद्या 9 नोव्हेंबर रोजी आपला 47 वा वाढदिवस साजरा करतायत. राजकीय नेते मंडळींचा वाढदिवस म्हणजे शुभेच्छांचे शेकडो फ्लेक्स, हजारोंची गर्दी,पार्ट्या, जेवणावळी, पण पुण्याचे महापौर याला अपवाद आहेत. आपल्या वाढदिवसादिनी त्यांनी सध्याची रक्ताच्या तुटवड्याची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी जास्तीत जास्त रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांचं पुणेकरांना पत्र

“कोरोना संसर्गाची पार्श्वभूमी आणि पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण यामुळे पुणे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून केवळ ५-६ दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे व्यापक पातळीवर रक्तदानाची नितांत आवश्यकता आहे. हाच रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन माझा वाढदिवस ‘रक्तदान संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.”

“मंगळवार, दि. ९ नोव्हेंबर, २०२१ रोजी शुभारंभ लॉन्स येथे सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत आपल्या संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पुष्पगुच्छ, हार-तुरे, केक, भेटवस्तू किंवा होर्डिंगच्या माध्यमातून देण्याऐवजी रक्तदान करून द्याव्यात.”

“वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षी मित्र परिवारासह पक्ष सहकारी, हितचिंतक, कार्यकर्ते वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा देतात. त्या सर्वांना माझी विनंती आहे. यंदाच्या वर्षी शहरातील रक्तपिशव्यांची तूट लक्षात घेता रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपत शुभेच्छा द्याव्यात”, अशा आशयाचं पत्र महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुणेकरांना लिहिलं आहे.

हे ही वाचा :

पुणेकरांनी करुन दाखवलं, कोरोनाला हरवून दाखवलं, महापौर मोहोळांची प्रतिक्रिया वाचून सगळ्यांनाच अभिमान वाटेल!