Vasant More : दीर आला नाही, म्हणून काय झालं..! महिलेला केलेल्या मदतीनं वसंत मोरेंचं होतंय कौतुक

| Updated on: Jun 16, 2022 | 4:49 PM

रात्री उशिरा कात्रज-कोंढवा राजस चौकात वसंत मोरे गेले होते. तेथे त्यांना पीएमपीएमएलची एक बस लाइट लागलेल्या अवस्थेत उभी दिसली. गाडीचा वाहक बसभोवती फिरत तर चालक बसमध्येच बसून होता. वसंत मोरेंनी यावेळी विचारपूस करत महिलेची मदत केली.

Vasant More : दीर आला नाही, म्हणून काय झालं..! महिलेला केलेल्या मदतीनं वसंत मोरेंचं होतंय कौतुक
वसंत मोरे, पीएमपी बस चालक-वाहक आणि महिला प्रवासी
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणारे मनसे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्या एका चांगल्या कामाची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मंगळवारी रात्री ते भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यासाठी गेले असता त्यांना कात्रज चौकात पीएमपीएमएल (PMPML) बसशेजारी एक महिला आपल्या लहान बाळसह एकटीच उभी असल्याचे दिसले. त्यानंतर वसंत मोरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्या महिलेला आणि तिच्या चिमुकल्या बाळाला स्वतःच्या गाडीत बसवले आणि घरी सुखरूप सोडले. यावेळी आपल्या जबाबदारीचे भान दाखवणारे पीएमपीएमएलचे कंडक्टर नागनाथ नवरे, ड्रायव्हर अरूण दसवडकर यांचेही मोरे यांनी आभार मानले. महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनीही ट्विट करत मोरे यांच्या या कामाबद्दल कौतुक केले आहे.

काय घडले होते?

रात्री उशिरा कात्रज-कोंढवा राजस चौकात वसंत मोरे गेले होते. तेथे त्यांना पीएमपीएमएलची एक बस लाइट लागलेल्या अवस्थेत उभी दिसली. गाडीचा वाहक बसभोवती फिरत तर चालक बसमध्येच बसून होता. वसंत मोरेंनी चालकाकडे विचारणा केली. तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही सासवडहून आलो आहोत. गाडीत एक महिला तिच्या छोट्या बाळाला घेऊन बसली आहे. त्या इकडे बाजूला राहतात. त्यांना राजस चौकात त्यांचा दीर घ्यायला येईल, असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र 15 मिनिटे झाली कुणीच आले नाही किंवा त्यांचा फोनही लागत नाही.

हे सुद्धा वाचा

यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक

बसचे चालक-वाहक श्री नागनाथ नवरे आणि अरुण दसवडकर तसंच श्री वसंत मोरे यांचे मनापासून कौतूक. महिला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आपण केलेले काम उल्लेखनीय आहे, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत. यासंबंधी त्यांनी ट्विट केले.

काय म्हणाले वसंत मोरे?

चालकाचे सर्व ऐकून घेतल्यानंतर वसंत मोरे स्वत: त्या महिलेचे दीर झाले. ते म्हणाले, दीर आला नाही, म्हणून काय झाले. मीच त्यांचा दीर होतो. असे म्हणत त्यांनी त्या महिलेला गाडीत घेतले आणि सुखरूप घरी पोहोचवले. घरी पोहोचल्यानंतर त्या ताईंसोबत फोटोही घेतला. शिवाय बसचे चालक आणि वाहक दोघांचेही आभार मानले. महिलेच्या घरच्यांना त्यांनी यावेळी खडे बोल सुनावले.