
राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यातच आता पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र आजच्या दिवशी पुण्यात राजकीय भूकंपाची स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून काडीमोड होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी मनसेला सोबत घेऊन नवा पुणे पॅटर्न मैदानात उतरवला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागावाटपावरून रस्सीखेच सुरु होती. भाजपने शिवसेनेला केवळ १७ जागांचा प्रस्ताव दिला होता. यामुळे पुण्यातील स्थानिक नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी रात्री उशिरापर्यंत पुण्यातील एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेतली. जर पुण्यात सन्मानजनक जागा मिळत नसतील तर आम्ही स्वबळावर लढू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. विजय शिवतारे रात्री १२ वाजताच पत्रकार परिषद घेऊन याबद्दलची घोषणा करणार होते. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीमुळे ही घोषणा तूर्तास लांबणीवर पडली आहे.
तसेच परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंत्री उदय सामंत यांना पुण्यात पाठवले आहे. आज सकाळी १० वाजता उदय सामंत यांनी पुण्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन अंतिम तोडगा काढणार आहेत. जर या बैठकीत जागा वाढवून मिळाल्या नाहीत, तर शिवसेना पुण्यात स्वतंत्रपणे उमेदवार उभे करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने शिवसेनेला केवळ १७ जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, शिवसेनेचे स्थानिक नेते किमान ३५ ते ५० जागांसाठी आग्रही आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
पुण्याच्या राजकारणात सर्वात धक्कादायक वळण म्हणजे काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर हे नवे समीकरण आकारास आले आहे. १६५ जागांच्या पुणे महानगरपालिकेत काँग्रेस १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे. शिवसेना ठाकरे गटाला ६५ जागा देण्यात आल्या आहेत. शिवसेनेने आपल्या कोट्यातील ६५ पैकी २१ जागा मनसेला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या आघाडीमुळे पुण्यात तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळू शकते.
दरम्यान निवडणूक अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असून उमेदवारांकडे केवळ सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ आहे. पुण्यात गेल्या सात दिवसांत ७४३ अर्ज दाखल झाले असून काल एकाच दिवसात ६९४ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. बहुतांश पक्षांनी अधिकृत याद्या जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्म (AB Form) वाटले आहेत. यामुळे बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न पक्षश्रेष्ठी करत असले, तरी आज दुपारी ३ वाजेपर्यंत अनेक अनपेक्षित चेहरे अर्ज भरताना दिसणार आहेत.