धर्मापेक्षा माणुसकी मोठी; लेकीच्या लग्नात अडचणीत सापडलेल्या पित्याला मुस्लीम कुटुंबीयांची मदत

आकर्षक सजावट, पाहुणे, जेवणाची लगबग असताना अचानक मुसळधार पावसाने लॉन जलमय झाला. वर-वधूचे कुटुंबीय भिजले आणि लग्न कसं पार पाडायचं हा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा शेजारच्या हॉलमधील एका मुस्लीम कुटुंबाने मोलाची मदत केली.

धर्मापेक्षा माणुसकी मोठी; लेकीच्या लग्नात अडचणीत सापडलेल्या पित्याला मुस्लीम कुटुंबीयांची मदत
pune wedding story
Image Credit source: Tv9
| Updated on: May 22, 2025 | 11:13 AM

पुण्यातील वानवडीमधील एसआरपीएफच्या अलंकार लॉनमध्ये मंगळवारी संध्याकाळी कवडे आणि गलांडे या दोन कुटुंबीयांची लग्नाची गडबड सुरू होती. अगदी आकर्षक फुलांनी आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने लॉन सजवण्यात आला होता. सगळी पाहुणेमंडळी जमा झाली होती. जेवणाच्या टेबलांवरही पाहुण्यांची गर्दी सुरू झाली होती. अगदी पंडितही लग्नातील मुख्य विधीची तयारी करत होते. नवरदेव आणि नवरी सजून मांडवात पोहोचणार इतक्यात धो धो पाऊस सुरू झाला. ज्या लॉनमध्ये विवाह सोहळा संपन्न होणार होता, तो लॉन अचानक अतिवृष्टी झाल्यामुळे जलमय झाला. पाहुणेमंडळी, नातेवाईक, नवरदेव आणि नवरीचे आईवडीलही पावसात चिंब भिजले. त्यामुळे आता विवाहसोहळा पूर्ण कसा करायचा असा प्रश्न निर्माण झाला होता. लाडक्या लेकीचं मोठ्या थाटामाट्याने लग्न करायचं स्वप्न या पावसात कसं पूर्ण करायचं असा प्रश्न वधूच्या वडिलांना पडला होता.

अशा परिस्थितीत एका बापाला दुसऱ्या बापाची मोलाची मदत मिळाली. विशेष म्हणजे मदत करणारे ना त्यांच्या जातीचे होते ना धर्माचे. जिथे या मराठी कुटुंबाचं लग्न पार पडणार होतं, त्या लॉन शेजारीच एका हॉलमध्ये मुस्लीम धर्मीय नवविवाहितांचं स्वागतोत्सव सुरू होता. मुलीच्या लग्नासाठी हॉलशिवाय दुसरा पर्याय नाही असं लक्षात आल्यावर कवडे कुटुंबीयांनी शेजारच्या हॉलमधील फारूक काझी यांना परिस्थितीची कल्पना दिली. तेव्हा काझी यांनी लगेचच त्यांच्या नवविवाहित जोडप्याला मंचावरून उतरायला सांगितलं आणि विवाह सोहळ्यासाठी त्यांचा मंच दीड तासांसाठी स्वखुषीने रिकामा केला.

कवडे आणि गलांडे कुटुंबीयांचा लग्नसोहळा पूर्ण झाल्यावर काझी परिवारातील स्वागत समारंभ त्या हॉलमध्ये पुन्हा सुरू झाला. अशा पद्धतीने एकाच हॉलमध्ये एकाच मंचावर हिंदू – मुस्लिम अशा वेगवेगळ्या धर्मातील जोडप्याचा विवाहसोहळा पार पडला. अडचणीच्या काळात देवासारखं मदतीला धावून आलेल्या काझी परिवाराचं कवडे आणि गलांडे कुटुंबीयांनी मनापासून आभार मानले.

“माझ्या मुलीच्या लग्नसोहळ्यात पावसामुळे मोठं संकट निर्माण झालं होतं. अशा परिस्थितीत काझी परिवाराने आम्हाला मदत केली आणि हा विवाहसोहळा पार पडला. खरंतर जात धर्मापेक्षा माणुसकी महत्त्वाची असते आणि त्याचं दर्शन आम्हाला काल घडलं,” अशा शब्दांत वधूचे वडील चेतन कवडे यांनी भावना व्यक्त केल्या.