कोयता गँग आता म्हणेल, पळा..पळा.. पुणे पोलिसांचा हा पॅटर्नच वेगळा

| Updated on: Feb 09, 2023 | 1:43 PM

पोलिसांच्या या योजनेमुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढणार आहे. पोलिसांचा नागरिकांशी सहज संपर्क होणार आहे. यामुळे नागरिक पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देतील.

कोयता गँग आता म्हणेल, पळा..पळा.. पुणे पोलिसांचा हा पॅटर्नच वेगळा
पुणे पोलीस
Follow us on

पुणे : कोयता गँगच्या (koyta gang) विरोधात पुणे पोलिसांच्या (Crime News) धडक कारवाया सुरु आहेत. या गँगचा म्होरक्यासह अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. काही जणांवर मकोका लावण्यात आला आहे. काही जणांना हद्दपार करण्यात आले आहे. कोयताची विक्री करताना आधारकार्डची सक्ती करण्यात आली आहे. या सर्व उपायानंतरही कोयता गँगने डोके वर काढले आहे. त्यांची अजूनही शहरात दहशत आहे. पुणे शहरातील हल्ले कमी होत नाही. कोयता गँगचा धुमाकूळ शाळा, महाविद्यालयांपर्यंत पोहचला आहे. यामुळे पुणे पोलिसांनी अजून एक नवीन आयडिया आणली आहे. यामुळे पुणे पोलिसांचा सक्तीचा व्यायाम होणार आहे.

काय आहे पोलिसांची योजना

पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आता नवीन योजना आणली आहे. या योजनेनुसार पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रोज पायी गस्त घालायची आहे. संध्याकाळी पाच ते आठ दरम्यान ही पायी गस्त असणार आहे. गेल्या चार दिवसांपासून या योजनेची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांसह पोलीस उपायुक्तपर्यंतचे अधिकारी यात सहभागी होणार आहे. पोलीस कर्मचारी व अधिकारी पायी फिरत असताना लोकांचा विश्वास वाढणार आहे.

काय होणार फायदा

पोलिसांच्या या योजनेमुळे नागरिक आणि पोलिसांमधील संवाद वाढणार आहे. पोलिसांचा नागरिकांशी सहज संपर्क होणार आहे. यामुळे नागरिक पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देतील. पायी गस्त योजनेमुळे नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास वाढेल. रस्त्यावर पोलिसांचा गस्त वाढल्यामुळे गंभीर गुन्हे रोखणे शक्य होईल, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होईल.

काय आहे पोलिसांचा प्लॅन

गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस आयुक्त राकेश कुमार यांनी यापुर्वीही मास्टर प्लॅन तयार केला होता. अल्पवयीनमधील मास्टरमाइंडचा शोध घेण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. अल्पवयीन मुलांनी केलेल्या गुन्ह्यांचे रेकॉर्ड तयार करण्याचे कामही सुरु केले आहे. गुन्ह्यातील अल्पवयीन मुलांच्या मागे कोणते गुन्हेगार काम करत आहे, त्यांना रसद पुरवली जात आहे का? याचा तपास केला जात आहे.

शाळांमध्ये समुपदेशन

भाई-दादांचा रुबाबामुळे अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत आहे. यामुळे पोलिसांनी शाळांमध्ये समुपदेशन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सन 2022 मध्ये 303 गुन्ह्यांत 476 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यापैकी 42 मुलांचा मागे कोणत्या अन् कोणत्या गुन्हेगारांचा हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, गंभीर दुखापत असे गुन्हे या मुलांवर दाखल होते.