प्रा. हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार; नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांचे गंभीर आरोप

Sanjay Sonawani on Hari Narke Passed Away : प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत, हदयाचा आजार असताना हरी नरके यांच्यावर अस्थमाचे उपचार झाले, डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; प्रा.हरी नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांचा गंभीर आरोप

प्रा. हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार; नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांचे गंभीर आरोप
| Edited By: | Updated on: Aug 09, 2023 | 3:56 PM

पुणे | 08 ऑगस्ट 2023 : ज्येष्ठ विचारवंत प्रा. हरी नरके यांचं आज निधन झालं आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर शोक व्यक्त होत आहे. अशातच त्यांच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित करण्यात आली आहे. हरी नरके यांचे मित्र, लेखक संजय सोनवणी यांनी शंका उपस्थित केली आहे. हरी नरके यांच्यावर चुकीचे उपचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून शासनाने याची चौकशी करावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

हदयाचा आजार असताना हरी नरके यांच्यावर अस्थमाचे उपचार झाले, असे गंभीर आरोप हरी नरकेंचे मित्र संजय सोनवणी यांनी केले आहेत. हरी नरके यांच्या मृत्यूला लीलावती रुग्णालयातील डॉक्टर जबाबदार आहेत. अस्थमाचा त्रास नसतानाही त्यांच्यावर उपचार केले गेले. हरी नरके यांना हदयाचा आजार होता. मात्र त्यांच्यावर अस्थमाचे उपचार करण्यात आले. जामनगरवा गेल्यावर कळालं की उपचार चुकीचे होत आहेत. डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि शासनाने याची चौकशी करावी, अशी मागणी संजय सोनवणी यांनी केली आहे.

संजय सोनवणी यांनी हरी नरके यांनी त्यांना पाठवलेला 22 जूनला त्यांना पाठवलेला मेसेजही फेसबुक शेअर केला आहे. यातून चुकीचे उपचार होत असल्याचं हरी नरके यांनीच आपल्याला सांगितल्याचं संजय सोनवणी म्हणाले आहेत. प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत, असं संजय सोनवणी यांनी सांगितलं आहे.

संजय सोनावणी यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

प्रतिक्रिया द्यायला माझ्याकडे शब्द नाहीत.

हरीभाऊंचा मला आलेला २२ जून २०२३चा whatsapp संदेश-

“प्रिय भाऊ, नमस्कार

गुजरात जामनगर ला 3 आठवडे ट्रीटमेंट घेऊन पुण्यात घरी पोचलो आहे. अंगात थोडा ताप आहे. खूप अशक्तपणा आहे. बीपी लो आहे. आधी हातापायावर खूप सूज होती. शरीरात 20 किलो पाणी ज्यादाचे साठले होते. त्यामुळे किडनी व हार्टवर प्रेशर येऊन श्वास घ्यायला खूप त्रास होत होता. ट्रीटमेंटमुळे 20 दिवसात 20 किलो पाणी ड्रेन झाले. त्यामुळे श्वास पूर्ण मोकळा झाला. मात्र बीपी 60 90 असे लो असून विकनेस खूप आहे. लीलावती हॉस्पिटलच्या नामवंत डॉक्टरांच्या निष्काळजीपणे 10 महिने त्रास सहन करावा लागला. शिवाय हार्टफेल व किडनी फेलच्या धोक्याच्या 4 थ्या स्टेजवर आलो होतो. जास्तीत जास्त 2 महिने लाईफ मिळाले असते. हार्टफेल व किडनी फेलने मृत्यू निश्चित होता.

लीलावतीमधील नामवंत Cardeologist, pulminologist खूप लॅब रिपोर्ट मागवतात पण ते वाचत नाहीत. त्यामुळे हार्ट नॉर्मल आहे. किडनी नॉर्मल आहे. असे अँजिओग्राफी करून लेखी रिपोर्ट दिलेत त्यांनी. परिणामी फॉलोअपला पुण्याचे डॉ. अभिजित वैद्य, महेंद्र कावेडिया, औरंगाबादचे डॉ. आनंद निकाळजे सगळेच चकले. लीलावतीवाले हार्टऐवजी मला नसलेल्या अस्थमावर उपचार करीत राहिले. पण धाप लागणे वाढतच गेले. धोका वाढतच गेला.  हा लिलावतीचा लॅब रिपोर्ट सांगतो हार्ट फेलचा धोका आठपट आहे .. पण त्यांनी वाचलाच नाही.आणि ऑल ओके असा चुकीचा रिपोर्ट लिहून दिला. तो 10 महिन्यात 21पट झाला होता.
आता बरा होतोय.”

माझा हसता खेळता ज्येष्ठ बंधू गेला. काय म्हणू?

Follow Us