
योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 29 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला 40 दिवसांचा अवधी दिला. पण या काळात सरकारकडून कोणताही निर्णय घेतला नाही. यावरून विरोधक आणि मराठा समाज सरकारवर टीका करत आहे. सरकारवर होणाऱ्या या टीकेला मंत्री शंभुराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. मराठा आरक्षणाबाबत त्या 40 दिवसात सरकारने कामच केलं नाही म्हणणं योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी 23 बैठका घेतल्या, असं शंभूराज देसाई म्हटलं. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
मंत्रिमंडळ उपसमितीचा सदस्य म्हणून मी माझी भूमिका मांडत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे भेटीला गेल्यानंतर उपोषण मागे घेतलं. त्यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला. त्यांनी दिलेल्या 40 दिवसात सरकारने काहीच काम केलं नाही, असं भासवलं जात आहे. मात्र या 40 दिवसात सरकारने काम केलं आहे. मराठा आरक्षणासाठी समिती गठीत केली. त्यांना लागणारी सर्व यंत्रणा उभी केली गेली. त्यामुळे सरकारने काहीच केलं नाही, असं म्हणणं योग्य नाही, असं शंभूराज देसाई म्हणालेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. सध्या तेलंगणामध्ये आचारसंहिता सुरू असल्यामुळे कागदपत्रे देण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे शिंदे समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मराठा आरक्षण सर्वच मराठा बांधवांना दिलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत मराठा आरक्षणावरही सरकराची भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासाठी 23 बैठका घेतल्या, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.
तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत काय म्हटलं, मला माहिती नाही. उद्या भेटतील तेव्हा त्यांना विचारतो. विनायक राऊत काय पत्र लिहितात. तो त्यांचा अधिकार आहे, असं म्हणत राजकीय आरोप प्रत्यारोपांवर शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांची मुलाखत नीट बघा… एकनाथ शिंदे कुठंही अपात्र होणार नाहीत. त्यामुळे प्लॅन बीची काहीही गरज नाहीये, असं म्हणत आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावरही शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र आंदोलन उभं राहिलं आहे. मराठा आरक्षणसाछी आणखी एका तरुणाने आत्महत्या केली आहे. त्यामुळे बीडमधील मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यामुळे धुळे-सोलापूर हायवेवर रास्तारोको केला आहे. यावेळी टायर जाळत घोषणाबाजी करण्यात आली.