आधी दम लागला, नंतर चक्कर येऊन खाली पडला, पुन्हा राजगडाची चढाई करताच छातीत कळ आली अन्… धक्कादायक घटनेनं पुणे सुन्न

तटबंदीच्या डागडुजीच्या कामामुळे चढाईस सोपा असलेला राजगडचा चोर दरवाजा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागराज आणि त्याचे सहकारी मित्र गुंजवणे दरवाजा मार्गाने गडावर चढाई करत होते. दरम्यान, नागराजचा मृत्यू झाला आहे.

आधी दम लागला, नंतर चक्कर येऊन खाली पडला, पुन्हा राजगडाची चढाई करताच छातीत कळ आली अन्... धक्कादायक घटनेनं पुणे सुन्न
raigad death
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 26, 2026 | 4:58 PM

पुण्यातील राजगड किल्ल्यावर अवघड गुंजवणे दरवाजा मार्गाने चढाई करताना २१ वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. नागराज कोरे असे मृत तरुणाचे नाव आहे. नागराज कोरे हा पुण्यातील आपल्या पाच -सहा मित्रां बरोबर राजगडावर फिरण्यासाठी आला होता. चोर दरवाजा मार्ग बंद असल्याने पर्यटकांना वेगळ्या मार्गाने जावे लागत आहे. या मार्गाने जात असताना 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. तटबंदीच्या डागडुजीच्या कामामुळे चढाईस सोपा असलेला राजगडचा चोर दरवाजा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागराज आणि त्याचे सहकारी मित्र गुंजवणे दरवाजा मार्गाने गडावर चढाई करत होते. गुंजवणे प्रवेशद्वाराच्या खाली अति बिकट टप्प्यात चढाई करताना नागराज याला दम लागला. नंतर चक्कर येऊन तो खाली पडला. त्यानंतर मित्रांनी त्याला धिर देत उठवले. थोड्या वेळाने नागराज हा पुन्हा चढाई करू लागला. मात्र त्याला पुन्हा दम लागला. छातीत दुखु लागले आणि काही वेळातच तो खाली कोसळून निपचिप पडला. सोबतच्या मित्रांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो उठला नाही. नागराज कोणतीही हालचाल करत नव्हता.

गडावरील पुरातत्व विभागाचे सुरक्षा रक्षक विशाल पिलावरे यांना माहिती मिळताच स्थानिक युवक गणेश ढेबे तसेच काही पर्यटकांसह त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागराज कोरेचा मृतदेह गडावर आणला. त्यानंतर खासगी वाहनातून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला. नागराज कोरे पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होता. आज सुट्टी असल्याने तो मित्रांसोबत फिरण्यासाठी राजगडावर आला होता. गुंजवणे दरवाजा मार्ग चढाईस अवघड असल्यामुळे त्याला धाप लागली. त्यानंतर चढताचढता त्याचा मृत्यू झाला.

गुंजवणे दरवाजा मार्ग हा बिकट आहे. त्यामुळे सोपा असलेला चोर दरवाजा मार्ग लवकर सुरू करण्यासाठी तटबंदीच्या दुरुस्तीचे काम वेगाने करण्यात यावे अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या राजगड किल्ल्यावर देशी विदेशी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. असे असताना शंभर फूट लांबीच्या तटबंदीचे काम एकच गवंडी करत आहे त्यामुळे काम मंदगतीने सुरू आहे.