Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा; सुषमा अंधारे म्हणाल्या, यांना भीती…

Sushma Andhare on India Alliance Mumbai Meeting : पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा; सुषमा अंधारे म्हणाल्या, यांना भीती...

Maharashtra Politics : पंतप्रधान मोदी पुण्यातून निवडणूक लढणार असल्याची चर्चा; सुषमा अंधारे म्हणाल्या, यांना भीती...
| Edited By: | Updated on: Sep 01, 2023 | 3:26 PM

पुणे | 01 सप्टेंबर 2023 : देशातील प्रमुख विरोधी पक्षांची इंडिया आघाडीची बैठक होतेय. यावर महायुतीच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे. संस्कार असणारे लोक जेव्हा सभ्य भाषेमध्ये काही बोलतात. तेव्हा उत्तर दिलीच पाहिजेत. पण अशी अभद्र आणि अमंगल भावना भाषा वापरतात. अशा लोकांवर आपण बोलू नये, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. महायुतीची बैठक आणि लोकसभा निवडणूक यावरही सुषमा अंधारे यांनी भाष्य केलं आहे.

आमदार संजय गायकवाड यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. कितीही विरोधी पक्ष एकत्र आले तरीही काहीही होणार नाही. पंतप्रधान मोदी यांचा कुणीही सामना करू शकणार नाही. कारण कितीही जनावरं एकत्र आली, तर वाघाची शिकार करू शकत नाहीत!, असं म्हणत संजय गायकवाड यांनी टीकास्त्र डागलं. त्यांच्या या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं आहे.

महायुतीची बैठक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लढणार असल्याचं बोललं जात आहे. मोदींजी पुण्यातून लढणार असतील तर त्यांचं स्वागतच आहे. कदाचित मोदींना स्वतःच्या मतदारसंघातून निवडून येण्याची शक्यता वाटत नसावी. त्यामुळे नरेंद्र मोदी पुन्हा तिथं उभं राहायला घाबरत आहेत किंवा पुण्यात भाजपला दुसरा लायकीचा उमेदवार मिळत नसेल. म्हणून पंतप्रधान पुण्यातून लढणार असल्याची चर्चा होतेय, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर आणि विशेषत: भाजपवर निशाणा साधला आहे.

इंडिया आघाडीचं संयोजकपद कुणाकडे असेल याची राजकीय वर्तुळासह इंडिया आघाडीतही चर्चा आहे. यात मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यावर सुषमा अंधारे यांनी सविस्तर भाष्य केलं. शरद पवार हे महाराष्ट्रातच नाही. तर भारतात वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने ज्येष्ठ व्यक्तिमत्व आहेत. त्यामुळे त्यांचा आदर ठेवत बैठकीत आसनव्यवस्था केली असेल. संयोजक पद इंडिया टीमसाठी सध्या महत्त्वाचं नाही. इंडियाची बैठक पंतप्रधान करण्यासाठी नाही. तर भारतातली लोकशाही व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आहे, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

मनसेकडून काल ट्विट करण्यात आलं अमेय खोपकर यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीवर टीका केली. तसंच महाराष्ट्रातील प्रश्नांकडे लक्ष द्या असंही ते म्हणाले. याला सुषमा अंधारे यांनी उत्तर दिलं. सुपारी बाज आंदोलकांच्या प्रश्नांना उत्तर देणार नाही. उदय सामंतांनी खर्चाची चिंता करू नये. दाओस बैठकीला जाताना तुम्ही कुणाकुणाला घेऊन गेलात. तो खर्च कुणी केला? सरकारी खर्चाने खर्च करणं योग्य होतं का? बीकेसीच्या मेळाव्याला दहा कोटी रुपयांचा जो खर्च झाला होता. त्याचा हिशोब द्यावा, असं सुषमा अंधारे म्हणाल्यात.