Pune rain : गणेशदर्शनासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचा हिरमोड, मुसळधार पावसानं झोडपलं; रस्त्यांवर पाणीच पाणी!

आज संध्याकाळच्या दरम्यान देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने आधीच मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

Pune rain : गणेशदर्शनासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांचा हिरमोड, मुसळधार पावसानं झोडपलं; रस्त्यांवर पाणीच पाणी!
पाऊस, संग्रहित छायाचित्र
Image Credit source: tv9
| Updated on: Sep 07, 2022 | 5:39 PM

पुणे : पुण्यात मुसळधार पावसाला (Heavy rain) सुरुवात झाली आहे. अनेक भागांतील रस्त्यांवर पाणी साचले आहे. पावसामुळे गणपती दर्शनासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची मात्र यामुळे तारांबळ उडाली आहे. पुढच्या काही तासांत पुणे शहर आणि जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने (India Meteorological Department) दिला आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 8 सप्टेंबरपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे, असे ट्विट हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी केले आहे. काही जिल्ह्यांमधील काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्यापासून जरी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी पुणेकरांना मात्र आजच पावसाने झोडपले आहे.

अनंत चतुर्दशीदिवशी मुसळधार…

पुण्यात सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. शुक्रवारी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आज आणि उद्या असे दोनच दिवस देखावे पाहण्याची संधी पुणेकर गणेशभक्तांना आहे. मात्र गणेशभक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळच्या दरम्यान देखावे पाहण्यासाठी घराबाहेर पडलेल्या पुणेकरांना पावसाने झोडपले आहे. हवामान विभागाने आधीच मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच शुक्रवारी अतिमुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आलेला आहे.

गंभीर हवामानाचा इशारा

के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 7 सप्टेंबरच्या सुमारास पूर्वमध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4-5 दिवसांसाठी गंभीर हवामानाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

बीड जिल्ह्यात लावली होती हजेरी

उत्तर पुणे, अहमदनगर आणि नाशिकच्या लगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह तीव पर्ज्यन्यवृष्टी होणार आहे. काल राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. बीड जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस बरसला होता. आज मात्र सर्वत्र निरभ्र आकाश आणि उन्हाचा चटकादेखील जाणवला.