
मुंबई: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची दहा वर्षांपूर्वीची व्हिडीओ क्लिप काढून त्यांना अडचणीत आणलं जात आहे. सुषमा अंधारे हिंदू धर्माच्या विरोधी असल्याचं सांगून त्यांच्याविरोधात वारकऱ्यांनी आंदोलनही केले आहे. या प्रकरणी सुषमा अंधारे यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतरही त्यांच्यावर हल्ला सुरूच आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे यांच्या समर्थनात थेट माजी पोलीस अधिकारीच आला आहे. सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालली आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा, असा सल्लाच या पोलीस अधिकाऱ्याने दिला आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी ही पोस्ट लिहिली आहे. सुषमा अंधारे यांनी ही पोस्ट आपल्या फेसबुक पेजवर शेअर केली असून सुरेश खोपडे यांची ही पोस्ट अत्यंत ऊर्जादायी असल्याचं म्हटलं आहे.
माजी पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांनी पोस्टमधून भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. तसेच सुषमा अंधारे यांची पाठराखण केली आहे. तसेच सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री ही उघडे पडले. देवेंद्रजी, कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा. नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत, असा इशाराच सुरेश खोपडे यांनी दिला आहे.
सकाळी सकाळी अंकूश काकडे काका यांनी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे सर यांची ही अत्यंत ऊर्जादायी पोस्ट पाठवली ….
सुषमा अंधारे यांच्या जाळ्यात कोण कोण अडकले?
आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे नाही असे जाहीर करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि मंडळींचे हिंदुत्व उघडेनागडे करून दाखविले. त्यानंतर महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले गेले. सुषमाताईंनी संयतपणे विरोधकांना प्रश्न विचारून राजकीय दृष्ट्या नामोहरण केले.
त्यांच्याकडे उत्तरे नाहीत. बचाव करता येत नाही म्हणून त्यांनी ज्याना जाणवे व शेंडीच्या पलिकडचा हिंदू धर्म माहीत नाही त्या तथाकथित वारकऱ्यांना पुढे केले. त्यात नकली वारकऱ्यांचा दर्जा दिसून आला. तात्पर्य एका महिलेने तीन-चार महिन्यात फेकलेल्या जाळ्यात एवढे मासे अडकले.
ती क्लिप दहा-बारा वर्षांपूर्वीची असताना ती पुन्हा दाखवली गेली आणि त्यावर तथाकथित वारकरी महिला व पुरुषांनी सुषमा अंधारे यांना वारकऱ्यांना न शोभणारी भाषा वापरली. एवढेच नव्हे तर हल्ला करण्याची फाडून टाकण्याची भाषा केली. हे सगळे देवेंद्र फडणवीस यांचे भाडोत्री सैनिक दिसतात.
राजकारण्यावर शाई फेकली तर खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्हे देवेंद्र फडणवीस दाखल करतात. मग सुषमा अंधारे यांना दिल्या गेलेल्या धमक्याबाबत देवेंद्र अजूनही अभ्यासच करत आहेत काय? यात गृहमंत्री ही उघडे पडले. देवेंद्रजी कायद्याचा अभ्यास लवकर पूर्ण करा नाहीतर तुम्हाला जाब विचारण्यासाठी आम्ही येणार आहोत.
सुषमाताई तुमची मांडणी योग्य दिशेने चालू आहे. तुम्हाला ते धमकावून विचलित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही तुमचे काम चालू ठेवा. पक्ष असो अगर नसो. आम्ही तुमच्या बरोबर आहोत!
अशा मांडणीतूनच समाज व्यवस्थेची रचना आधुनिकतेकडे आणि घटनेवरील आधारित मूल्यावर पुढे नेता येईल. सिव्हिल सोसायटी म्हणून ते आपणा सर्वांचे एक कर्तव्यच आहे.
– सुरेश खोपडे