Sambhaji Chhatrapati : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही, स्वराज्य संघटना त्याचाच एक भाग; संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य

| Updated on: Sep 03, 2022 | 11:26 AM

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने योग्य सन्मान झाला नसल्याचे म्हणत या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली होती. त्यानंतर 12 मेला स्वराज्य संघटना स्थापन केली होती.

Sambhaji Chhatrapati : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही, स्वराज्य संघटना त्याचाच एक भाग; संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य
संभाजीराजे छत्रपती
Image Credit source: Twitter
Follow us on

पुणे : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही. राजकारणात येण्याचाच प्रयत्न केला जातो. शेवट हा राजकारणच असतो. कारण राजकारणाच्या माध्यमातून आपण समाजसेवा करतो. स्वराज्य संघटना (Swaraj Sanghatana) हा त्याचाच एक भाग आहे, असे वक्तव्य संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Chhatrapati) यांनी केले आहे. ते पुण्यात बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यातून ते आगामी काळात राजकारणात सक्रिय होणार असल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच संभाजीराजे छत्रपती यांनी राजकारणात उतरण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संभाजीराजे छत्रपती महाराष्ट्रातून राजकारणाला सुरुवात करणार आहेत. सिंधिया आणि शाहू घराण्याचे आधीपासूनच संबंध आहेत. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राजवाड्याला आज भेट देणार आहेत. याविषयीची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.

ज्योतिरादित्य सिंधियांचा कोल्हापूर दौरा

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेणार आहेत. दुपारी तीनच्या दरम्यान विमानतळ विस्तारीकरणाबाबत आढावा बैठक ते घेणार आहेत. कोल्हापूर-मुंबई विमान सेवेबाबत ते आज मोठी घोषणा करण्याचीही शक्यता आहे. सिंधियांच्या कोल्हापुरातील आगमनानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. सिंधिया यांनी ट्विट करत सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले. आता सिंधियांच्या दौऱ्यानिमित्त संभाजीराजे छत्रपती यांनीही आपले मत व्यक्त केले आहे.

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने स्थापन केली संघटना

राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने योग्य सन्मान झाला नसल्याचे म्हणत या निवडणुकीतून संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली होती. त्यानंतर 12 मेला स्वराज्य संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या माध्यमातून राज्यभर दौरे करणार असल्याचेही ते म्हणाले होते.

हे सुद्धा वाचा

‘स्वराज्य संघटना राजकीय झाली तरी वावगे समजू नका’

अनेकांनी मला स्वतंत्र पक्ष काढण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मी स्वराज्य संघटित करण्यावर भर देणार आहे. स्वराज्य ही संघटना उद्या राजकीय पक्ष झाला तरी त्यात वावगे समजू नये, असे ते म्हणाले होते. आता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. राजकारणापासून कोणीही लांब राहू शकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.