
पुणे | 9 ऑक्टोंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी आपला वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची साथ अजित पवार यांनी सोडली. परंतु त्यांचा नातू रोहित पवार हे या काळात शरद पवार यांच्यासोबत सावली प्रमाणे होते. यामुळे शरद पवार यांनी रोहित पवार यांना राजकारणातील राजकीय क्षितिजावर उदय करण्याचा निर्णय घेतला आहे. आता रोहित पवार हे शरद पवार यांच्या 1980 मधील शेतकरी दिंडीप्रमाणे युवा संघर्ष यात्रा काढणार आहे. त्या माध्यमातून राज्यभर फिरणार आहेत.
शरद पवार यांची शेतकरी दिंडी 1980 मध्ये जळगाव ते नागपूर निघाली होती. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी ही दिंडी होती. या दिंडीतून शरद पवार यांचा उदय राष्ट्रीय राजकारणात झाला. त्यांच्या संघटन कौशल्याची चुणूक दिसली. जळगाव ते नागपूर अशी 480 किलोमीटरच्या या दिंडीतून शरद पवार यांनी आपली ताकद दाखवून दिली. 7 डिसेंबर 1980 रोजी जळगावातून ही दिंडी सुरु झाली होती. नागपूर अधिवेशनापर्यंत पोहचण्यापूर्वीच ही यात्रा बरखास्त करण्याची तयारी तत्कालीन अंतुले सरकारने केली होती. मात्र शरद पवार यांनी शेतकऱ्यांना गनिमी काव्याने रात्रीतून नागपुरात घुसवून त्यांची झोप उडवली. त्यानंतर राजीव गांधी यांनी शरद पवार यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घेतले.
1980 नंतर आता 2023 मध्ये शरद पवार यांचे रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात त्या मागे शरद पवार आहेत. एकूण 22 मुद्दे घेऊन रोहित पवार संघर्ष यात्रा काढणार आहे. त्यात युवकांचेही मुद्दे आहेत. 24 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरपर्यंत रोहित पवार यांची ही यात्रा चालणार आहे. यात्रेच्या माध्यमातून रोहित पवार 800 किलोमीटर प्रवास करणार आहेत. या माध्यमातून 13 जिल्ह्यात ते जाणार आहेत.
रोहित पवार 24 तारखेला महात्मा फुले वाडा आणि लाल महालात जाऊन आशीर्वाद घेणार आहे. त्यानंतर पुण्यात शरद पवार यांची सभा होणार आहे. विद्यार्थ्यांच्या या सभेला शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.
पुणे, नगर, बीड, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर अशी ही यात्रा असणार आहे. रोहित पवार रोज 18 ते 24 किमी चालणार आहे. सकाळी सहा वाजता यात्रेची सुरुवात होणार आहे.
संघर्ष यात्रे दरम्यान दिवाळीच्या दिवशी ज्या गावात रोहित पवार असतील, त्या ठिकाणीच दिवाळी साजरी करणार आहेत. त्या दिवशी रोहित पवार यांचे कुटुंबीय यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेच्या समारोपाला शरद पवार येणार आहेत.