‘काँग्रेसच्या धोरणांबाबत माझेही मतभेद’, शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शरद पवार आज तब्बल 24 वर्षांनंतर काँग्रेस भवनला गेले. काँग्रेसच्या 137 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते काँग्रेस भवनात गेले. यावेळी त्यांनी महत्त्वाचं विधान केलं.

काँग्रेसच्या धोरणांबाबत माझेही मतभेद, शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 28, 2022 | 9:55 PM

रणजित जाधव, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज तब्बल 24 वर्षांनंतर पुण्यातील काँग्रेस भवनला भेट दिली. काँग्रेसच्या 137 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी ते काँग्रेस भवनात गेले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दलही महत्त्वाचं विधान केलं. भाजपकडून काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली जाते. पण भाजपच्या काँग्रेसमुक्त भारतच्या रणनीतीवर शरद पवारांनी टीका केला. कॉंग्रेस मुक्तभारत होऊ शकत नाही, असं शरद पवार म्हणाले. तसेच काँग्रेससोबत माझेही मतभेद आहेत, पण काँग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही, असं शरद पवार उघडपणे म्हणाले.

“मी सर्वात आधी 1958 ला काँग्रेस भवनात आलो होतो. त्यावेळी अनेक नेते काँग्रेसमध्ये कार्यरत होते. पुणे म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे पुणे असं समीकरण निर्माण झालं होतं. स्वातंत्र्यनंतर काँग्रेसचे केंद्र हे पुणे होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार पुण्यातून चालत होता”, असं शरद पवार म्हणाले.

“इथून कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामध्ये पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“काही लोक कॉंग्रेसमुक्त भारत करायचं म्हणतात. पण कॉंग्रेस मुक्तभारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही आहेत, पण कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल”, अशी भूमिका शरद पवारांनी मांडली.