अदृश्य हात महाराष्ट्रात काही तरी घडवण्यासाठी षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप; इशारा कुणाकडे?

| Updated on: Jun 12, 2023 | 2:18 PM

शेतकऱ्यांच्या फसवणुकीवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या विरोधात धोरण घेतंय. केंद्र सरकारला पहिला यूटर्न घ्यायला शेतकऱ्यांनीच भाग पाडलं. आज दूधासह शेतमालाचे भाव पडलेत.

अदृश्य हात महाराष्ट्रात काही तरी घडवण्यासाठी षडयंत्र रचतोय, सुप्रिया सुळे यांचा गंभीर आरोप; इशारा कुणाकडे?
supriya sule
Image Credit source: ani
Follow us on

बारामती : राज्यात जिल्हा परिषदेपासून ते महापालिकेच्या निवडणुका रखडल्या आहेत. वारंवार सांगूनही राज्य सरकार निवडणुका घेत नाहीयेत. त्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत. या निवडणुका का होत नाहीत? असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी मोठं विधान केलं आहे. कोणतातरी अदृश्य हात महाराष्ट्रात काहीतरी घडवण्यासाठी षडयंत्र रचतोय. हे तर दिसतच आहे, असं मोठं आणि धक्कादायक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी हे विधान केलं आहे.

औरंगजेबाच्या मुद्दयावरून राज्यातील वातावरण धुमसत आहे. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यालाच धारेवर धरलं आहे. गृहमंत्रालय काय करतंय? अशा गोष्टींवर लक्ष ठेवणं हे गृह मंत्रालयाचं काम आहे. दोन महिन्यांपूर्वी सतेज पाटील यांनी अशा घटना होतील अशी शंका व्यक्त केली होती. सतेज पाटलांना आधी समजत असेल तर पोलिस यंत्रणा काय करतेय. महाराष्ट्रातल्या गृह विभागाचं सातत्याने अपयश पाहायला मिळतंय. सातत्याने महाराष्ट्रात अशा घटना होतातच कशा..?, असा संतप्त सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

पोलीस कुणाच्या बाजूने?

वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरही त्यांनी भाष्य केलं. आळंदीतील घटना धक्कादायक आहे. त्याचा मी निषेध करते. सातत्याने या देशातील पोलिस यंत्रणा जिथे आवश्यकता असते तिथे कधीच नसते. मात्र देशासाठी पदक मिळवणाऱ्या आंदोलक मुलींवर लाठीचार्ज करायला पुढे असतात. 350 वर्षे विठ्ठलाच्या दर्शनासाठी शांततेच्या मार्गाने जातात. त्यांच्यावर हल्ला होणं हे दुर्दैवी आहे. पोलिस यंत्रणा नक्की कोणाच्या बाजूने आहे हा प्रश्न. दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्रातही पोलिसांची चुकीची वागणूक दिसत आहे, असं त्या म्हणाल्या.

भाजपकडे अजेंडाच नाही

अजित पवार यांच्या नाराजीवरून विरोधकांनी राष्ट्रवादीवर टीका केली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजप आंब्याच्या झाडावरच दगड मारणार. त्यामुळे अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस याच्यापुढे भाजपकडे अजेंडाच नाही. रोज भाजप आमच्यावरच टीका करतंय. त्यातून तुम्हाला कळेल कोणतं नाणं मार्केटमध्ये चालतं, असा टोला त्यांनी लगावला.