लढाई संपलेली नाही… नरेंद्र दाभोलकरप्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोळकरांची पहिली प्रतिक्रिया

Narendra Dabholkar murder Case Verdict : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणात पुणे येथील सीबीआय विशेष कोर्टाने पाच पैकी तिघांची निर्दोष सुटका केली. दोघांना दोषी ठरवले. याप्रकरणी हमीद दाभोलकरांनी लढा सुरुच राहणार हे स्पष्ट केले. त्यांनी याप्रकरणातील महत्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधले.

लढाई संपलेली नाही... नरेंद्र दाभोलकरप्रकरणात न्यायालयाच्या निकालानंतर हमीद दाभोळकरांची पहिली प्रतिक्रिया
लढाई संपलेली नाही, हमीद दाभोलकरांची पहिली प्रतिक्रिया
| Updated on: May 10, 2024 | 11:56 AM

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात पुणे येथील सीबीआय विशेष न्यायालयाने निकाल सुनावला. त्यात पाच पैकी तिघांची निर्दोष सुटका करण्यात आली तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना कोर्टाने दोषी ठरवले. याप्रकरणात हमीद दाभोलकरांची प्रतिक्रिया आली आहे. कोर्टाच्या निकालावर समाधान व्यक्त करतानाच त्यांनी ही लढाई संपलेली नसल्याचे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा

न्यायालयाच्या निकालाचा आम्ही स्वागत करतो. न्यायव्यवस्थेवरती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर आम्ही सातत्याने विश्वास ठेवत आलेलो होतो. इथल्या कायदा सुव्यवस्थेवरती विश्वास ठेवला. आणि आज त्या प्रकरणांमध्ये दोन जणांना प्रत्यक्ष जे संशयित मारेकरी होती त्यांना शिक्षा झालेली आहे. एका पातळीवर हा न्याय झालेला आहे. उरलेले जे तीन आरोपी सुटलेले आहेत, त्यांच्याविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही लढाई आम्ही घेऊन जाऊ, असे हमीद दाभोलकर यांनी स्पष्ट केले.

दाभोलकरांचे विचार संपलेले नाहीत

प्रत्यक्षामध्ये माणसाला मारून त्याचा विचार संपवता येत नाही आणि अशा पद्धतीने डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर त्यांचं काम संपलेलं नाही. उलट निर्धाराने हे काम चालू राहिलेले हे अधोरेखित होतं. ज्या ज्या विचारधारांकडे याच्याविषयी संशयाची सोयी होती दोन जणांना शिक्षा झाली आहे ही निश्चितच समाधानाची बाब आहे, अशी प्रतिक्रिया हमीद दाभोलकर यांनी दिली.

सूत्रधार मोकाट

प्रत्यक्षामध्ये जे मारेकरी होते त्यांना शिक्षा झालेली आहे. पण यामागे जे कटामध्ये सूत्रधार होते त्याचे आणि त्यातला मुळातला जो सूत्रधार आहे त्याला मात्र अटक झालेली नाही आणि जे बाकीचे सूत्रधार आहे त्यांची सुटका झालेली आहे. त्यांच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत आम्ही जाऊ,असा निर्धार त्यांनी या निकालानंतर व्यक्त केला.

काय दिला निकाल

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणत पुणे सीबीआय विशेष न्यायालयाने पाच आरोपींपैकी तिघांची निर्दोष मुक्तता केली. तर शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांना दोषी ठरवले. सीबीआय कोर्टाने प्रकरणात डॉ. वीरेंद्र तावडे, अँड. संजीव पन्हाळेकर आणि विक्रम भावे यांची मुक्तता केली. 11 वर्षानंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणातील खटल्याचा निकाल आला आहे.