अखेर 10 महिन्यानंतर विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली

| Updated on: Jan 24, 2021 | 12:13 PM

पुत्रदा एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात 10 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतेय. (Pandharpur Vithoba Temple)

अखेर 10 महिन्यानंतर विठुरायाची पंढरी वारकऱ्यांनी गजबजली
पंढरपूर वारकरी
Follow us on

सोलापूर: कोरोना विषाणू संसर्गाच्या सावटातून सर्वजण सावरत आहेत. राज्यातील धार्मिक स्थळ आता पुन्हा भाविकांच्या गर्दीनं गजबजू लागल्याचं पाहायला मिळतंय. आज ( 24 जानेवारी) पुत्रदा एकादशी असल्याने श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात 10 महिन्यानंतर आज पहिल्यांदाच मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतेय. जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. पंढरपूरच्या विठोबा मंदिरातील ऑनलाईन पास नोंदणी पद्धत रद्द केल्याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाल्याचं पाहायला मिळतेय. (two lakh piligrimage gather in Pandharpur to visit Vithoba Temple)

पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी

पौष महिन्यातील पुत्रदा एकादशी असल्याने विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी राज्याच्या विविध भागातून जवळपास दोन लाख भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. मुखदर्शनाची रांग मंदिरापासून दोन किलोमीटर लांब गेली आहे. कोविड 19 संसर्ग नंतर पहिल्यांदाच पंढरपूरात लाखो भाविकांची गर्दी झाली आहे. शनिवार पासूनच पंढरपूरातील भक्त निवास, मठ, धर्मशाळा, लॉज हाऊसफुल्ल झाले आहेत. 20 जानेवारी पासून ऑनलाईन दर्शन पास सक्ती बंद केल्याने भाविकांनी दर्शनास येण्यासाठी प्राधान्य दिले आहे. भाविकांची संख्या वाढत असल्यानं कोरोनामुळे बिघडलेले आर्थिक चक्र आता व्यवस्थित सुरु होईल, अशी आशा पंढरपूरमधील व्यापारी कपिल देशपांडे यांनी सांगितले.

पंढरपूर भाविकांची गर्दी

वाढत्या भाविक संख्येमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दर्शन रांगेत भाविकांना प्रवेश करतानाच मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सक्तीचा केला आहे. भाविकांची संख्या अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यानं सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याची भीती आहे.

मंदिर प्रशासनाने जास्तीत जास्त भाविकाना दर्शन मिळावे यासाठी ओनलाइन दर्शनाची सक्ती कमी केली आहे. याचा परिणाम भाविकांची संख्या वाढण्यात झाला आणि आता दर्शनासाठी गर्दी वाढू लागली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या अपंग भाविकांना देखील मंदिर प्रशासनाने उत्तर द्वार येथून सोडण्याचा निर्णय घेतल्याने समाधान वाटल्याचं शितल गायकवाड या ठाणे येथून आलेल्या महिलेने सांगितले.

विठोबा मंदिर, पंढरपूर

20 जानेवारीपासून ऑनलाईन पासची अट रद्द

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन सुविधा रद्द करून कोरोनाचे सर्व नियम पाळून 20 जानेवारी पासून दर्शन खुले करण्याचा निर्णय घेण्यात आलं आहे. यामध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती व 10 वर्षा खालील लहान मुलांना मात्र प्रवेश बंदी कायम ठेवण्यात आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीत समितीची बैठक पार पडली होती. त्यामध्ये हा महत्वपूर्ण घेण्यात आला. त्या निर्णयाचा परिणाम आजच्या पंढरपूरमध्ये झालेल्या भाविकांच्या गर्दीवरुन दिसून येतो.

संबंधित बातम्या:

ऑनलाईन बुकिंग असेल तरच मिळणार विठ्ठलाचं दर्शन, पंढरपूर मंदिरात दररोज 1 हजार भाविकांना प्रवेश

ऑनलाईन नोंदणीशिवाय भाविकांना विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन, पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय

(Two lakh piligrimage gather in Pandharpur to visit Vithoba Temple)