
Vaishnavi Hagawane Death Case Updates: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या पक्षातील नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. सुनेच्या मृत्यूनंतर राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा शंशाक फरार झाला आहे. दोन्ही आरोपींना शोधण्यासाठी बावधन पोलिसांची दोन पथके परराज्यात गेली आहे. दरम्यान, वैष्णवीने लग्नासाठी घरांच्या मंडळींचा विरोध पत्करला. वडील आयसीयूमध्ये असताना पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, असे वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. अजितदादा या लग्नात होते, आता त्यांनी त्यांच्या बहिणीला न्याय द्यावा, अशी मागणी बहिरट यांनी केली.
वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी सांगितले की, वैष्णवीच लव्ह मॅरेज आहे. या लग्नाला कुटुंबातील सर्वांचा विरोध होता. परंतु वैष्णवी माझ्याकडे सातत्याने शंशाक सोबत लग्न करायचे आहे, असे सांगत होती. हगवणे कुटुंबाने तिच्यावर काय जादू केला, तिला पूर्ण संमोहीत केले होते, त्यामुळे ती ऐकवण्यास तयार नव्हती. यामुळे त्यांच्या घरात अनेक वेळा वाद झाले. वैष्णवीचे वडील आनंद हे दवाखान्यात आयसीयूमध्ये ऍडमिट होते. त्या वेळी शशांक आणि त्याची बहीण घरी आले. ते वैष्णवीला आताच्या आता आमच्या सोबत चल, मी तुला घेऊन जाणार आहे, असे म्हणाले. त्यावेळी वैष्णवीने माझ्या मुलाला फोन केला. मी शशांक सोबत पळून जाणार आहे, असे सांगितले. मुलाने मला सांगितले.
आम्ही रुग्णालयातून धावत घरी आलो. वैष्णवीला समजवले. तू वेडी आहेस, तुझे वडील आयसीयूमध्ये आहेत आणि तू हा निर्णय घेत आहेस, परंतु ती ऐकवण्यास तयार नव्हती. त्यामुळे मी वैष्णवीच्या कुटुंबियांना समजवून सांगितले. समाजात आपली इज्जत जाईल, असे सांगून लग्न जुळवून आणले. लग्नाची बोलणी करण्यासाठी जी बैठक झाली त्या बैठकीत शंशाककडून फॉर्च्यूनर गाडीचा आग्रह धरला. तसेच सोन्याची मागणी झाली. एक लाख 20 हजाराचे घड्याळ घेतले. सहा महिन्यानंतर जे काही घडू लागले, तेव्हा वैष्णवी मला म्हणत होती, मामा माझी चूक झाली.
वैष्णवी आणि शशांक यांचे लग्न थाटामाटात झाले होते. या शाही लग्नाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, राजाभाऊंनी तुमच्याकडे गाडी मागितली की, तुम्ही दिली. आता अजितदादा तुम्ही तुमच्या बहिणीस न्याय द्या, अशी मागणी वैष्णवीचे मामा उत्तम बहिरट यांनी केली.