विधिमंडळ आमदारांच्या समितीच्या सदस्यांसाठी कोट्यवधी रुपयांची रक्कम, शासकीय विश्रामगृहात घबाड, माजी आमदाराचा आरोप
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात आलेल्या आमदारांना देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी कोट्यवधींची रक्कम जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.

धुळ्यात शासकीय विश्रामगृहात कोट्यवधी रुपयांची रक्कम सापडली आहे. गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड आढळली. या रोकड रक्कमेची मोजणी गुरुवारी पहाटे चार वाजता संपली. त्यानंतर पहाटे चार वाजता पोलिसांनी ती खोली सील केली. धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विधिमंडळातील अंदाज समितीमधील आमदारांना देण्यासाठी रक्कम जमा केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे.
नोटा मिळाल्यानंतर मागवले मशीन
धुळ्यातील गुलमोहर शासकीय विश्रामगृहातील खोली क्रमांक 102 मध्ये एक कोटी 84 लाख 84 हजार रुपयांची रोकड सापडली. या खोलीत मोठ्या प्रमाणावर रोकड रक्कम असून त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार अनिल गोटे यांनी केली होती. रक्कम असल्याची खात्री झाल्यानंतर पोलीस अधिकारी, बांधकाम विभागातील अधिकारी व महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पंचनामा करण्यात आला.
रात्री ११ वाजता प्रातांधिकारी रोहन कुवर, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आर.आर.पाटील, शिवसेना उबाठाचे नरेंद्र परदेशी, कॅमेरामन माळी या पाच लोकांच्या कमिटीने खोलीचे कुलूप तोडले. त्यानंतर तपासणी केली असता खोलीत नोटा सापडल्या. यामुळे नोटा मोजण्याचे मशीन मागवण्यात आले.




अनिल गोटे यांचा आरोप
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अंदाज समितीचा तीन दिवसीय दौरा धुळ्यात सुरू झाला. या दौऱ्यात ११ आमदार आले आहे. या समितीत आलेल्या आमदारांना देण्यासाठी पाच कोटी रुपये शहरातील गुलमोहर रेस्ट हाऊसच्या दोन नंबरच्या खोलीत ठेवण्यात आले आहेत, असा आरोप शिवसेने ठाकरे गटाचे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला होता. त्यानंतर ते त्या खोलीच्या बाहेर बसून राहिले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक विभागीय आयुक्त यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर हालचाली सुरु झाल्या. अधिकारी घटनास्थळी पोहचले. या प्रकरणामुळे राज्यभर खळबळ उडली आहे.