Vaishnavi Hagawane Death : निर्लज्जपणाचा कळस! हगवणे पिता-पुत्राचा मटणावर ताव, व्हिडिओ व्हायरल

Rajendra Hagawane -Sushil Hagawane : वैष्णवी हगवणे मृ्त्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर येत आहे. वैष्णवीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. प्रकणात राजेंद्र आणि सुशील या बाप-बेट्यांनी एका हॉटेलमध्ये मटणावर ताव मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Vaishnavi Hagawane Death : निर्लज्जपणाचा कळस! हगवणे पिता-पुत्राचा मटणावर ताव, व्हिडिओ व्हायरल
राजेंद्र हगवणे, सुशील हगवणे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 23, 2025 | 11:30 AM

वैष्णवी हगवणे हिने सासरकडील जाचाला कंटाळून अखेर मृत्यूला कवटाळले. हुंड्यासाठी तिचा छळ झाल्याचा आरोप कसपटे कुटुंबियांनी केला आहे. प्रकरणात तिची सासू, नणंद आणि दीर यांना अटक करण्यात आली होती. तर सासरा राजेंद्र हगवणे आणि मोठा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर या नराधमांना सूनेच्या आत्महत्येनं कुठलाही पश्चाताप झाला नसल्याचे समोर येत आहे. एका हॉटेलमध्ये या नराधमांनी मटणावर ताव मारला. या दोघांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

निर्लज्जपणाचा कळस

वैष्णवी हिने आत्महत्या केल्यानंतर अटकेच्या भीतीने राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे फरार झाले होते. या दोघांच्या शोधासाठी पोलिसांची पथक रवाना झाली होती. दोघे फरार होते. पुणे पोलिसांनी शुक्रवारी भल्या पहाटे त्यांना अटक केली. या अटकेपूर्वी या दोघांनी तळेगाव येथील एका हॉटेलमध्ये मटणावर मनसोक्त ताव मारला. या विषयीचा व्हिडिओ आता समोर आला आहे. सून जीवानिशी गेलेली असतानाही या नराधमांच्या काळजाला पाझर फुटला नाही. दोघे मस्तपैकी मटणावर ताव मारताना दिसत आहेत. त्यामुळे आरोपी अटकेविषयी आणि वैष्णवीच्या मृत्यूविषयी किती बेफिकीर होती, किती निर्लज्ज आहेत, हे समोर येत आहे. याविषयीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

16 मे रोजी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. तिच्या आई-वडिलांनी वैष्णवीचा पती शशांक, सासू, नणंद करिष्मा, दीर सुशील आणि सासरा राजेंद्र यांच्यावर मानसिक आणि शारिरीक छळ केल्याचा आरोप केला होता. जमीन खरेदीसाठी हगवणे कुटुंबिय दोन कोटी रुपयांची मागणी करत असल्याचे समोर येत आहे. याविषयी कसपटे कुटुंबियांनी तक्रार दिली आहे. दरम्यान आता याप्रकरणात अटक झालेल्या आरोपींची संख्या पाचवर पोहचली आहे. तर वैष्णवीचे बाळ हे तिच्या आई-वडिलांकडे काल अज्ञाताने सुपूर्द केले होते. या सर्वांवर मकोका लावण्याची मागणी जोर धरत आहे.