वैष्णवी हगवणे प्रकरण : न्याय मिळाला नाही तर…, जरांगे पाटलांचा थेट सरकारला इशारा, केली मोठी मागणी

वैष्णवी हगवणे प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे, आता या प्रकरणावर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरण : न्याय मिळाला नाही तर..., जरांगे पाटलांचा थेट सरकारला इशारा, केली मोठी मागणी
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 8:07 PM

पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली होती, वैष्णवी हगवणे या विवाहीत महिलेनं गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं, सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे, या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, तिचा दीर, सासू, सासरा आणि नदंण यांना अटक केली आहे, या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आज मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी मोठी मागणी केली आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील? 

वैष्णवीने आत्महत्या केली नसून ही हत्या असल्याचं दिसून येत आहे, वैष्णवीच्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा अशी मागणी यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, सामूहिक कट रचून ही हत्या असल्याचं यातून दिसून येत आहे. फोटोमध्ये मारल्याचा खूणा स्पष्ट दिसत आहेत. या प्रकरणात मोक्का लावण्याची मागणी होत आहे, मात्र त्याची प्रक्रिया सुरू आहे का? हे कुटुंबाला कोणीच सांगत नाही, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

सत्तेमधील आरोपी आहेत म्हणून हे प्रकरण दाबलं असं वैष्णवीच्या कुटुंबाला वाटलं नाही पाहिजे, फाशी देऊन न्याय झाला पाहिजे, गृह विभाग कमी पडत आहे का? हे या प्रकरणावरून लक्षात येईल, जर न्याय झाला नाही तर पुन्हा उठाव होईल. महिला आयोग यासाठीच आहे, जर महिलांवर अन्याय होणार असेल तर कारवाई झाली पाहिजे.

महिला आयोगावर राजकीय व्यक्ती बसते, ती प्रत्येकाची प्रथा आहे, ज्याची सत्ता येते तो आयोगावर आपला व्यक्ती बसवतो. पण कुणीही या  आयोगावर असेल त्यांनी काम चांगलं केलं पाहिजे जेणेकरून नाव निघेल आणि महिलांना न्याय मिळेल, राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानाबाबत उद्या बोलले आज वैष्णवीसाठी न्याय मागायला आम्ही आलो आहोत. नेमका काय तपास सुरू आहे, याबाबतची माहिती कुटुंबाला कळवली जात नाही, तपाससंदर्भातील सर्व माहिती कुटुंबाला मिळाली पाहिजे, असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.