Pune Anand Dave : शरद पवारांच्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचे पुण्यात हिंदू महासंघाकडून स्वागत, आनंद दवे म्हणाले…

| Updated on: May 27, 2022 | 1:25 PM

आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची देही, याची डोळा पाहायला मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले आहेत.

Pune Anand Dave : शरद पवारांच्या दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाचे पुण्यात हिंदू महासंघाकडून स्वागत, आनंद दवे म्हणाले...
दगडूशेठ गणपतीच्या दर्शनास जाण्याच्या शरद पवारांच्या भूमिकेचे स्वागत करताना आनंद दले
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दगडूशेठ मंदिरातील गणपतीचे (Dagadusheth Ganpati) दर्शन घेणार ही स्वागतार्ह बाब असल्याचे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. आज दुपारी तीनच्या दरम्यान शरद पवार श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटीलदेखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंददेखील सध्या पुण्यात आहेत. लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या 125व्या वर्षाचा शुभारंभ सोहळा साजरा होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची प्रमुख उपस्थिती आहे. तर त्यांच्यासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील आदी प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. तर शरद पवार (Sharad Pawar) दुपारी दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेणार आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी विशेषत: हिंदू महासंघाने याचे स्वागत केले आहे.

‘हिंदुत्ववाद्यांना आनंद देणारी भूमिका’

आनंद दवे म्हणाले, की भक्त माणूस देवळात आला. शरद पवारसाहेब पुण्यातील दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेणार आहेत. याचा आम्हाला निश्चितच आनंद आहे. आजपर्यंत केवळ इफ्तार पार्टी करणारे पवार साहेब आता मंदिरात जात आहेत आणि आम्हाला ते याची देही, याची डोळा पाहायला मिळत आहे, ही आनंदाची बाब आहे. शरद पवारांनी घेतलेली ही भूमिका हिंदुत्त्ववादी लोकांना, कार्यकर्त्यांना निश्चितच आनंद देणारी आहे, असे हिंदू महासंघ मानतो, असे दवे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘यापुढेही हिंदुंच्या मंदिरात जाताना दिसतील’

आजपर्यंत शरद पवार इफ्तार पार्टीत त्यांच्या वेशभूषेतच दिसले आहेत. यापुढे पवारसाहेब हिंदुच्या पारंपरिक वेशामध्ये हिंदूंच्या मंदिरात जाताना दिसतील आणि आम्हाला ते पाहायला मिळेत. त्यामुळे या भूमिकेचे मनापासून स्वागत असे दवे यांनी म्हटले आहे. दरम्यान, शरद पवार नास्तिक असल्याच्या बातम्या मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून सुरू होत्या. त्यावर खुद्द शरद पवार यांनीही वस्तूस्थिती सांगितली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भूमिकेचे हिंदुत्ववाद्यांनी स्वागत केले आहे.