Supriya Sule : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?; सुप्रिया सुळे यांनी सांगितलेल्या पडद्यामागच्या घडामोडी काय?

अजितदादा गटाने राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांना हुकूमशाह म्हटलं आहे. अजितदादा गटाच्या या आरोपाचा खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला आहे. सुप्रिया सुळे यांनी भुजबळ यांनाच हुकूमशाह ठरवलं आहे.

Supriya Sule : शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा का दिला?; सुप्रिया सुळे यांनी सांगितलेल्या पडद्यामागच्या घडामोडी काय?
supriya sule
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 12, 2023 | 12:37 PM

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 12 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे राष्ट्रवादीत एकच खळबळ उडाली होती. शरद पवार यांच्या या खेळीमागचं कारण काय? पक्षातील नेत्यांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी तर शरद पवार यांनी हा निर्णय घेतला नाही ना? अशी चर्चा त्यावेळी रंगली होती. पवार यांच्या राजीनाम्याचे अनेक अर्थ काढले जात होते. पण नेमकं कारण कुणीही सांगण्यास तयार नव्हतं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज त्यावर भाष्य केलं आहे. त्यावेळी पडद्यामागे काय घडलं होतं? काय घडामोडी झाल्या होत्या? यावर सुप्रिया सुळे यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काल टीव्ही9 मराठीला मुलाखत दिली. टीव्ही9 मराठीचे व्यवस्थापकीय संपादक उमेश कुमावत यांनी घेतलेली ही मुलाखत प्रचंड गाजली. या मुलाखतीत भुजबळांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. भुजबळांनीही आपल्या खास शैलीत बेधडक उत्तरं दिली. पक्षांतर्गत गोष्टी सांगितल्या. भाजप आणि राष्ट्रवादीच्या जवळकीवर भाष्य केलं. आणि शरद पवार यांनी केलेल्या टीकेचा समाचारही घेतला. या मुलाखतीने राजकीय वर्तुळ ढवळून निघालं आहे. भुजबळांच्या या मुलाखतीवर खासदार सुप्रिया सुळे यांनीही भाष्य केलं आहे. त्यांनी भुजबळांचा एक एक मुद्दा खोडून काढत उलट भुजबळांनाच काही प्रश्न विचारले आहेत.

भाजपप्रेमामुळेच पवारांचा राजीनामा

यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांनी राजीनामा का दिला? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं यावरही भाष्य केलं. शरद पवार यांनी राजीनामा देण्यामागे राष्ट्रवादीतील नेत्यांचं भाजपप्रेम असल्याचा दावाही त्यांनी केला. शरद पवार यांना राजीनामा द्यायचाच नव्हता. पण पक्षातील या लोकांचा भाजपसोबत जाण्याचा आग्रह होता. त्यामुळे पवारसाहेब दुखावले होते. दुखावल्या गेल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिला. शरद पवार यांचा राजीनामा तुम्हाला नाट्य वाटत असेल. पण आमच्यासाठी ते वास्तव होतं. नंतर पक्षाने विनंती केली म्हणून त्यांनी राजीनामा मागे घेतला, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितला.

हुकूमशाह कसे

शरद पवार यांना अजितदादा गटाने हुकूमशाह संबोधलं आहे. शरद पवार हुकूमशाह सारखे वागत होते. परस्पर निर्णय घ्यायचे, असा दावा अजितदादा गटाने निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी एक समिती नेमली होती. पुढचा अध्यक्ष कोण होईल याचा निर्णय समितीने घ्यावा अशी सूचना शरद पवार यांनी केली होती. त्यावेळी कमिटीबिमिटी काही नको. आम्हाला तुम्हीच अध्यक्ष म्हणून पाहिजे. तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल असं भुजबळच म्हणाले होते. जर शरद पवारच अध्यक्ष हवे होते तर ते हुकूमशाह कसे? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी भुजबळांना केला.

हुकूमशाह कोण?

शरद पवार यांनी पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी समिती स्थापन केली होती. ते हुकूमशाह असते तर समिती स्थापन केली नसती. लोकशाही मार्गाने अध्यक्ष निवडण्याची व्यवस्था केली नसती. त्यांनी हुकूमशाह प्रमाणे थेट पुढच्या अध्यक्षाचं नाव घोषित केलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. तरीही शरद पवार हुकूमशाह कसे ठरतात? कमिटीला विरोध कुणी केला? भुजबळांनीच विरोध केला. मग हुकूमशाह कोण? शरद पवार की भुजबळ? असा सवाल त्यांनी केला.