शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती, अजित पवार यांना निमंत्रण गेले का ?

Sharad Pawar and Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धा घेतली जात आहे. या स्पर्धेला संपूर्ण पवार कुटुंबिय उपस्थित राहणार आहेत. अजित पवार या स्पर्धेला येणार आहेत का? त्याचे उत्तर आयोजक युगेंद्र पवार यांनी दिले आहे.

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती, अजित पवार यांना निमंत्रण गेले का ?
ajitj pawar and yugendra pawar
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Dec 23, 2023 | 2:35 PM

अभिजित पोते, पुणे, दि.23 डिसेंबर | बारामती तालुका कुस्ती संघातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. बारामती कुस्ती संघाचे अध्यक्ष आणि शरद पवार यांचे नातू युगेंद्र यांनी ही कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेनिमित्त युगेंद्र पवार यांची चर्चा सुरु झाली आहे. युगेंद्र पवार राजकारणात येणार असल्याचे म्हटले जात आहे. स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर शरद पवार आणि युगेंद्र पवार यांचे फोटो लावले आहेत. या स्पर्धेला शरद पवार यांना तसेच त्यांचे बंधू प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार आणि रणजीत पवार उपस्थित राहणार आहेत. पण या स्पर्धेला अजित पवार उपस्थित राहणार आहे का? यासंदर्भात चर्चा सुरु आहे. त्याचे उत्तर युगेंद्र पवार यांनी दिले आहे.

स्पर्धेला पवार कुटुंब उपस्थित राहणार

कुस्ती स्पर्धेनिमित्त टीव्ही ९ मराठीने युगेंद्र पवार यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना युगेंद्र म्हणाले की, सगळे पवार कुटुंब आजच्या स्पर्धेला उपस्थित राहणार आहे. शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिम्मित गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या कुस्त्या घेत आहोत. या स्पर्धेयला पवार कुटुंबातील सर्व सदस्यांना आपण निमंत्रण दिले आहे. प्रतापराव पवार, श्रीनिवास पवार आणि रणजीत पवार स्पर्धेला उपस्थित राहणार आहेत. आजचा राजकीय कार्यक्रम नसून कौटुंबिक कार्यक्रम आहे.

अजित पवार उपस्थित राहणार का?

अजित पवार आज बारामतीत नाहीत. ते बारामतीत असते तर या स्पर्धेला नक्की आले असते. आम्ही अजित पवार यांना निमंत्रण दिले आहे. अजित पवार यांना जर वेळ असेल तर नक्की येतील. ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहे. त्यांना इतरही खूप जबाबदाऱ्या आहेत. आम्ही दरवर्षी शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या तिन्ही नेत्यांचा फोटो येथे लावतो. माझ्यासाठी कुटुंब एकत्र आहे. कारण मी राजकारणात नाही, असे युगेंद्र यांनी म्हटले आहे.