Sunetra Pawar : बारामतीत प्रतिष्ठेच्या लढाईत सुनेत्रा पवार यांनी बाजी पलटल्यानंतर पुरुषोत्तम जगताप यांचा मोठा आरोप,शेवटच्या दोन दिवसात..
Sunetra Pawar : बारामतीत प्रतिष्ठेच्या लढाईत सुनेत्रा पवार यांनी बाजी मारली आहे. पवार विरुद्ध पवार हा सुद्धा सामना होता. त्यामुळे राज्याचं या निवडणुकीकडे लक्ष लागलं होतं. पण सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने दणदणीत विजयाची नोंद केली आहे.

विक्रम वरे, प्रतिनिधी : बारामतीत प्रतिष्ठेच्या बनलेल्या श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात या निवडणुकीची चर्चा रंगली होती. पवार विरुद्ध पवार तसचं पवार विरुद्ध पुरुषोत्तम जगताप असा सामना या निवडणुकीत रंगला होता. सोमेश्वर साखर कारखान्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने या निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि युगेंद्र पवार यांच्या पॅनलचा पराभव केला आहे. युगेंद्र पवार यांच्या पॅनलकडे शरद पवार यांचं पॅनल म्हणून पाहिलं जात होतं. पुढच्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक महत्वाची बनली होती.
सुनेत्रा पवार यांच्या पॅनलने 21 पैकी 21 जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. त्यांनी प्रतिस्पर्धी नेत्यांच्या पॅनलला मान वर काढण्याची सुद्धा संधी दिलेली नाही. आता निकालानंतर पुरुषोत्तम जगताप यांनी मोठा आरोप केला आहे. “पराभव आम्ही स्वीकारतो. जनमताचा आदर केला पाहिजे” असं ते म्हणाले. पण त्याचवेळी पुरुषोत्तम जगताप यांनी लक्ष्मीदर्शनाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला गेला असा आरोप केला. “मी यापूर्वी वेगळा पॅनल करण्याचा निर्णय घेतला. दोन ते तीन उपद्रवी लोकांचा त्या पॅनेलमध्ये समावेश होता” असं ते म्हणाले. पुरुषोत्तम जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत हा पॅनल उभा केला होता. राष्ट्रवादीतून त्यांचं निलंबन झालं आहे. “निलंबन केलं ठीक आहे.आता शेतकऱ्यांसाठी काम करत राहू. शेवटच्या दोन दिवसामध्ये ही चक्र फिरली. जगताप-काकडे आरोप प्रत्यारोप पुढेही पाहायला मिळणार. पुढे कोणत्याही पक्षात जाणार नाही” असं पुरुषोत्तम जगताप म्हणाले.
घरचा रस्ता दाखवला आहे
सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत गट नंबर 2 मुरूम वालहा गटामध्ये विजयी झाले आहेत. त्या गटामध्ये बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप यांचा पराभव झाला आहे. “हा विजय आम्ही अजितदादाना समर्पित करतो.विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांची शेवटपर्यंत वाट पाहत होतो. पुरुषोत्तम जगताप यांना आमच्या काही गोष्टी खटकत होत्या.त्यामुळे त्यांनी आमच्या उमेदवारीसाठी विरोध केला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या लक्षात काही गोष्टी आल्या की पुरुषोत्तम जगताप यांच्या मनात वेगळ्या गोष्टी चालू आहेत.ज्यांनी बंडखोरी केली, त्या पुरुषोत्तम जगताप यांना सभासदानी घरचा रस्ता दाखवला आहे. सभासदानी विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांना त्यांची जागा दाखवली आहे” असं विजयी उमेदवार राजवर्धन शिंदे, विक्रम भोसले, ऋषिकेश गायकवाड म्हणाले.