भारताची सर्वात मोठी ताकद कोणती? 70 कोटी… पुण्यातील सभेत राहुल गांधींचं सर्वात मोठं विधान
Rahul Gandhi : छात्रों की गूंज या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावरही आपले विचार व्यक्त केले आहेत.

लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. छात्रों की गूंज या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. आजच्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे? यावरही आपले विचार व्यक्त केले आहेत. राहुल गांधी यांच्या मते भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.
प्रत्येकजण वेगळा आहे – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात करताना म्हटले की, आजच्या कार्यक्रमाचा उद्देश मंचावर लिहिल्याप्रमाणे ब्रेक द केज (पिंजऱ्यातून बाहेर पडा) असं आहे. मला प्रथम तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की, तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनात वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतील. यात काही चांगल्या, काही वाईट गोष्टींचा समावेश असेल. तुम्हाला रस्त्यांवरून चालताना कधी भीती वाटली असेल. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. तुमच्यापैकी प्रत्येकजण हा या जगात वेगळा आहे. मी तुमच्यासारखा दुसरा व्यक्ती शोधण्याचा प्रयत्न केला तर तो मला सापडणार नाही. तुम्ही युनिक आहात, तुमच्या कडे तुमच्या जीवनासाठी स्वप्ने आहेत.
भारताची सर्वात मोठी ताकद कोणती?
राहुल गांधी यांनी पुढे बोलताना म्हटले की, ‘अनेकदा लोक मला विचारतात की भारताची सर्वात मोठी तादक काय आहे? याची तुम्हाला अनेक उत्तरे मिळतील. कोण म्हणेल आपली अर्थव्यवस्था, कुणी म्हणेल आपले सैन्य, कुणी म्हणेल आपले वैद्यकीय क्षेत्र, काहीजण म्हणतील आपले नागरिक, पण भारताची सर्वात मोठी ताकद काय आहे याबाबत मला स्पष्टता आहे की, आपले सर्वात मोठे संसाधन हे 70 कोटी महिलांच्या कल्पना, स्वप्ने आहेत.’
पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काही लोक मला प्रश्न विचारतील की देशात 70 कोटी पुरूषही आहेत, मग 70 कोटी महिला महत्त्वाच्या का? यामागे तुमचं लॉजिक काय आहे? माझं उत्तर हे आहे की, महिला नैसर्गिकरित्या जास्त सेन्सेटिव्ह, जास्त जेंटल असतात आणि त्यांना पुरूषांच्या तुलनेत जास्त सहानुभूती असते. त्यामुळेच मला विश्वास आहे की, महिला म्हणजे त्या तरूणी असोत, वृद्ध असोत त्या भारताची ताकद आहेत.