‘तू खूप सुंदर मुलगी आहेस,’ स्टेजवरूनच राहुल गांधींकडून तिचं कौतुक, भर सभेत नेमकं काय घडलं?
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छात्रो की गूंज कार्यक्रमात हजेरी लावली. देशव्यापी अभियानाचा चौथा टप्पा असून पु्ण्यात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात त्यांनी तरूणींशी संवाद साधून त्यांच्या व्यथा मांडल्या.

‘छात्रो की गूंज’ या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमाला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हजेरी लावली होती. या संवादादरम्यान त्यांनी महिला व मुलींची सुरक्षा, शिक्षण क्षेत्रातील समस्या, वाढती बेरोजगारी आणि परीक्षांमधील पेपरफुटी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. जवळपास या कार्यक्रमासाठी 25 ते 40 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात महाविद्यालयीन तरूणांची आणि विशेषत: झेन झी तरूण मोठ्या प्रमाणात होते. या कार्यक्रमापूर्वी बराच राडा झाल्याचं पाहायला मिळालं. कार्यक्रमाच्या एक दिवस आधी एबीवीपी आणि एनएसयूआयचे कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. त्यामुळे या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
राहुल गांधींचा त्या तरूणीसोबत काय संवाद झाला?
या कार्यक्रमाचं औचित्य साधत स्टेजवर राहुल गांधींचा दोन मुलींशी संवाद झाला. यावेळी एका मुलींनी आपल्या व्यथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासमोर मांडल्या. मी माझ्या वडिलांना तीन वर्षांपूर्वी गमावलं आहे. त्यावर राहुल गांधींनी पटकन विचारलं कसं काय? तेव्हा ती म्हणाली की माझ्या वडिलांना कँसर झाला होता. माझे वडील स्वच्छता कर्मचारी होते. त्यांच्यावर समाजाचं आणि नातेवाईकांचं बरंच प्रेशर होतं. त्यांच्या जाण्यानंतर मी काही बोलायची तर घरात मी काहीतरी मागत आहे असंच प्रत्येकाला वाटायचं. जर हे माझ्या भावाने सांगितलं तर त्याचा हक्कच आहे, असं समजलं जात होतं. पण मी सांगितलं तर हिस्सेदारी मागत असल्याचं वाटायचं. त्यानंतर मी शिक्षण घेऊन आले तेव्हा माझ्यावर लग्नाचं प्रेशर वाढलं. त्यातही लग्नासाठी सुंदर वगैरे मुलगी असावी असं दिसून आलं. तेव्हा राहुल गांधींनी पटकन तिला थांबवलं आणि म्हणाले की, ‘तू खूप सुंदर मुलगी आहेस.’
विद्यार्थिनीने व्यथा मांडताना पुढे सांगितलं की, मी शिक्षित असूनही मला या सगळ्यांना तोंड द्यावं लागतं. त्यावर राहुल गांधींनी आपलं म्हणणं मांडलं आणि सांगितलं की, तुम्हाला असं वाटतं का की पुरूषांनी तुमच्यावर नियंत्रण ठेवावं. तेव्हा गर्दीतून जोरदारपणे ‘नाही’ असं प्रत्युत्तर आलं. त्यानंतर राहुल गांधींनी महिलांवर कसे अत्याचार होतात? याबाबत विश्लेषण केलं. मुलींना जन्मापासून अत्याचार सहन करावे लागतात. भ्रूण हत्या केली जाते, त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी वावरताना छेडछाड केली जाते. मारहाण केली जाते. हिंसाचारापासून संरक्षण व्हावं यासाठी मुली जॉब किंवा शिक्षण सोडून देतात. या सर्व मुलींच्या मनातील व्यथा त्यांनी व्यासपीठावर मांडल्या.
