Bharat Gogawale : रायगडचा पालकमंत्री मीच, भरतशेठनी ठणकावून सांगितलं
Bharat Gogawale : पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. पण नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटू शकलेला नाही.

पुढच्या काही महिन्यात महाराष्ट्रात महायुती सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. पण नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटू शकलेला नाही. पण आता रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल. भरत गोगावले यांची रायगडच्या पालतमंत्री पदावर वर्णी लागेल अशी चर्चा आहे.दरम्यान भरतशेठच रायगडचा पालकमंत्री होणार अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमधून बोलत होते. “हा झेंडावंदनाचा काल आदेश काढला आहे. पालकमंत्री पदाबाबत काय चर्चा झाली हे मला शिंदे साहेबांना काल विचारता आलं नाही. कालपासून मी इकडेच आहे हा कार्यक्रम झाल्यानंतर मी त्यांना विचारणार आहे. नेमकी काय चर्चा झाली आणि कशामुळे थांबल आहे. जे काही आमच्या दोघांमध्ये मला का तुला आणि तुला का मला होतं, तो विषय संपला विधान परिषदेच्या निवडणुकीच्या काळामध्ये. त्याच्यामुळे आम्हाला द्यायचं हे फायनल झालंय, ठरलय. कुठे अडलय काय झाले, हे मी कार्यक्रम झाला की विचारतो” असं भरत गोगावले म्हणाले.
“तोडगा निघाला की निघाला नाही हे मला माहित नाही हे विचारल्याशिवाय कसं कळणार. 100% अडचणीचा भाग मला काही वाटत नाही” असं गोगावले म्हणाले. तुम्हाला पालकमंत्री पद का मिळत नाही काय झालं? यावर गोगावले म्हणाले की, “ते मी आता कार्यक्रम झाला की विचारतो. नक्की काय अडथळा आहे. कुठल्या देवाची नड आहे. जरा आम्हाला बघू द्या. अजून दोन दिवस बाकी आहेत, मला वाटते त्यामध्ये निर्णय होऊ शकतो. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जे ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. यामध्ये दुसरी काही अडचण मला वाटत नाही. ठरलंय पालकमंत्री भरत शेठ, आता गमजा नाही हात रुमाल आहे, फक्त जॅकेट घालायचं आहे” असं भरत गोगावले यांनी ठणकावून सांगितलं.
त्याच्या नेमकं उलटं घडत आलेलं आहे
अमित शाहंच्या दबावाखाली शिवसेना फोडली या संजय राऊत यांच्या दाव्यावर भरत गोगावले यांनी उत्तर दिलं. “संजय राऊत रात्रभर विचार करतात की, मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलटं सांगतात. आतापर्यंत जे बोलत आलेले आहेत त्याच्या नेमकं उलटं घडत आलेलं आहे, हे आपण पाहिलंय. कारण त्यावेळेला आम्ही 2022 पासून जे काही त्यांचं वक्तव्य ऐकतोय, ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आतापण जो काही निकाल आहे, तो त्यांच्या विरोधातच जाणार. ते एवढी मोठी बाब काय मला नाही सांगता येणार. ते संजय राऊतच सांगू शकतात. परंतु ठीक आहे” असं गोगावलेंनी सांगितलं.