मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग

राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे. शुक्रवारी राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट, खडकवासला, गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग
खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Jun 20, 2025 | 7:30 AM

Rain Alert: राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण, पुणे, मुंबईसह मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. राज्यात 25 जूनपर्यंत पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसाचा अधिक जोर असणार आहे. या भागात मुसळधार पावसाने 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई, पुणे, रायगड, सातारा, रत्नागिरीत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

पुणे जिल्ह्यातील घाट विभागात पावसावर वाढला आहे. गेल्या 24 तासांत तामिनी घाट परिसरात हंगामातील सर्वाधिक तब्बल 230 मीटर पावसाची नोंद झाली. लोणावळा, शिरगाव, वळवण, अंबावणे, खोपोली, खंद परिसरात 150 ते 200 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुण्यातील घाट विभागात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे ऑरेंज देण्यात आला असून पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

खडकवासलातून विसर्ग वाढवला

पुणे येथील खडकवासला धरणातून रात्री उशिरा विसर्ग वाढविला आहे. धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्याने 1.71 टीएमसीने पाणी वाढले आहे. खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या चार धरणांच्या पाणलोट परिसरात मागील 24 तासांत जोरदार पाऊस झाल्याने धरणांचा पाणी पातळी झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण 84 टक्के भरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाणी सोडण्यात सुरुवात झाली. रात्री 11 वाजता 15,000 हजार क्यूसेक्सने विसर्ग सुरु करण्यात आला.

नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी

नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे गंगापूर धरणातून सकाळी 530 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. दारणा धरणातून 4742 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदाघाट परिसरातील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आले. मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसाने विश्रांती घेतली आहे. परंतु धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने गोदाघाट परिसरात पुन्हा अलर्ट दिला आहे.

आंबेनळी घाटाबाबत महत्वाचा निर्णय

सातारा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पश्चिम भागातील घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे सातारा आणि रायगड जिल्हा प्रशासनाच्या वतीने महाबळेश्वर ते पोलादपूर जोडणारा आंबेनळी घाट संध्याकाळी सात वाजल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन दिवसांपासून महाबळेश्वरपासून पोलादपूर घाटात रायगड हद्दीत दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे आणि धुक्याचे प्रमाणही वाढल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पत्रकारद्वारे दिली आहे.