Rain Update : गणरायाच्या आगमनापूर्वी पावसानं टेन्शन वाढवलं, मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस
Rain Update : गणरायाच्या आगमनापूर्वीच पावसाची जोरदार सुरुवात झाली. उद्या गणरायाचं आगमन होणार असून, आजपासूनच पावसाची सुरुवात झाल्यामुळे गणपतीच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.

Rain Update : सोमवारी गणरायाचं आगमन होणार आहे. पण त्याआधीच पावसाने टेन्शन वाढवलं आहे. सोमवारी गणेश चतु्र्थी असल्याने आजच गणरायाची मुर्ती घरी नेण्याची अनेकांची योजना असेल, पण पावसाने हजेरी लावल्याने गणपतीच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे. अवघे काही तास शिल्लक असताना, मुंबई, उपनगर, ठाणे आणि कल्याण, डोंबिवली परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे.
कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावासाची सुरुवात
मुंबईत पावसाची सुरुवात झाली असून, कल्याण – डोंबिवलीत देखील मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. जवळपास दीड महिन्यांनंतर पावसाने शहरात पुनरागमन केले आहे. मुसळधार पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पण गणपतीच्या तयारीत विघ्न येण्याची शक्यता आहे.
कल्याण – डोंबिवलीच नाही तर, मुंबई उपनगरात कांदिवली, बोरिवली, मालाड, दहिसर आणि अंधेरी परिसरात रात्रीपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत मान्सूनने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. वसई – विरार, नालासोपाऱ्यात देखील मुसळधार पाऊस सुरु असून अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहर आणि उपनगर परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढंच नाही तर, विजांच्या कडकडाटासह व ताशी 40-50 किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. IMD कडून मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
