वाघ येतोय… जिथे राडा तिथेच सभा; मीरा रोडमध्ये आज राज ठाकरेंची तोफ कडाडणार

राज ठाकरे यांची मीरा रोडमधील भव्य सभा मराठी अस्मितेच्या प्रश्नावरुन निर्माण झालेल्या राजकीय वादावर केंद्रित आहे. अमराठी व्यापाऱ्यांविरुद्धच्या मनसेच्या मोर्चानंतर ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत राज ठाकरे मराठी भाषिकांना संबोधित करतील.

वाघ येतोय... जिथे राडा तिथेच सभा; मीरा रोडमध्ये आज राज ठाकरेंची तोफ कडाडणार
raj thackeray 1
| Updated on: Jul 18, 2025 | 9:35 AM

मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण तापले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अमराठी व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला. हे आंदोलन यशस्वी झाल्यानंत आज मीरा-भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी आज सकाळपासूनजय्यत तयारी करण्यात येत आहे. नित्यानंद नगर येथील रस्त्यावर ही सभा होणार आहे. या सभेमुळे जवळच्या सेंट पॉल शाळेला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी आज सकाळी ८ वाजता मनसे कार्यकर्त्यांनी स्टेजचे विधिवत पूजन करत स्टेज उभारणीला सुरुवात केली. या ठिकाणी २४ बाय २८ फुटांचा हा भव्य स्टेज तयार करण्यात येत आहे. याच ठिकाणी राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या नव्या शाखेचे उद्घाटनही केले जाणार आहे. विशेष म्हणजे ही सभा जोधपूर स्वीट अँड फरसाण दुकानापासून अवघ्या ३०० मीटर अंतरावर होणार आहे. याच फरसाणच्या दुकानाजवळ मनसैनिकांनी मराठी न बोलणाऱ्या एका व्यापाऱ्याला चोप दिला होता. राज ठाकरे यांचे याच दुकानासमोर प्रथम ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत केले जाईल. त्यानंतर ते सभेच्या ठिकाणी पोहोचतील.

या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील अमराठी व्यापाऱ्यांनी ४ जुलै रोजी आपली दुकाने बंद ठेवून डीसीपी कार्यालयावर मोर्चा काढला होता. याला प्रत्युत्तर म्हणून मनसेनेही ८ जुलै रोजी मराठी अस्मितेसाठी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरुवातीला यासाठी पोलिसांनी परवानगी नाकारली. मोर्चा अयशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यानंतर मीरा-भाईंदरमध्ये अनेक मराठी भाषिक लोक एकत्र आले आणि त्या दिवशी मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अखेरीस मोर्चा काढण्यात आला. ८ जुलैला या ऐतिहासिक मराठी मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मीरा रोडमध्ये येऊन कार्यकर्त्यांना शाबासकीची थाप देणार आहेत.

मनसैनिकांमध्ये उत्साह आणि राजकीय पाठिंबा

आज राज ठाकरे मिरा रोडमध्ये येणार असल्याने मनसे सैनिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. ते मराठी माणसांना काय संदेश देतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेला शिवसेना ठाकरे गटानेही पाठिंबा दर्शवला आहे. मीरारोडच्या नित्यानंद नगर सर्कलवर राज ठाकरेंची सभा पार पडणार आहे. या सभेच्या ठिकाणी अनेक स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ठाकरे गटाकडून राज ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.