
राज्यात एकीकडे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताना दिसत आहेत. सध्या अनेक नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये महायुतीने सुरुवातीच्या कलांमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. त्यातच आता आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंनी आज आपला मोर्चा पश्चिम उपनगरांकडे वळवला आहे. तिथे मनसेच्या अनेक नवीन जनसंपर्क कार्यालयांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जात आहे.
राज ठाकरे हे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांनी काल दक्षिण आणि पूर्व उपनगरांत जोरदार शक्तीप्रदर्शन केले होते. आज राज ठाकरे पश्चिम उपनगरातील ८ महत्त्वाच्या शाखांचे उद्घाटन करणार आहेत. आज सकाळीच राज ठाकरे हे शिवतीर्थ निवासस्थानाहून या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत.
राज ठाकरे आज गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर (शाखा ५६) आणि मालाडमधील एच पी शॉपिंग सेंटर (शाखा ४६), दत्ता मंदिर रोड (शाखा ३६) व कुरार व्हिलेज (शाखा ३७) येथे नवीन कार्यालयांचा शुभारंभ करणार आहेत. तसेच बोरीवली पश्चिमेकडील सत्यविजय सोसायटी (शाखा १८) आणि एक्सर मच्छी मार्केट (शाखा १०) येथे राज ठाकरे भेट देतील. तसेच दहिसर पश्चिमेकडील रामचंद्र पावसकर मार्गावरील शाखेचे (शाखा ७) उद्घाटन करणार आहेत. या दौऱ्याच्या सांगता जोगेश्वरी पूर्व येथील JVLR जवळील शाखा ७४ च्या उद्घाटनाने होईल. या दौऱ्याच्या माध्यमातून राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांशी संवाद साधून पक्षाची पुनर्बांधणी करताना दिसत आहे. ज्यामुळे मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.
एकीकडे राज ठाकरे मुंबईत पक्षसंघटन मजबूत करत असतानाच राज्याच्या ग्रामीण भागातून नगरपरिषद आणि नगरपंचायतींचे निकाल समोर येत आहेत. राज्यातील २८८ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीला आज सकाळी १० वाजल्यापासून सुरुवात झाली असून प्राथमिक कल हाती आले आहेत. या प्राथमिक कलांनुसार भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीने अनेक ठिकाणी निर्णायक आघाडी घेतली आहे. भाजप आतापर्यंत सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तर काही ठिकाणी भाजने बिनविरोध विजय मिळवला आहे. मतमोजणीपूर्वीच धुळ्यातील दोंडाईचा-वरवाडे आणि जामनेरमध्ये भाजपने आपली सत्ता निश्चित केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात महाविकास आघाडी (काँग्रेस आणि शरद पवार गट) आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.