
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या २००८ मधील एका जुन्या प्रकरणासाठी ठाणे कोर्टात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. २००८ मधील जुन्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी राज ठाकरे आज (११ डिसेंबर) ठाण्यातील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या कोर्टात हजर झाले. यावेळी, राज ठाकरे यांनी न्यायाधीशांसमोर मला गुन्हा कबूल नाही असे स्पष्ट केले. यावर न्यायालयाने प्रकरणावर लवकर तोडगा काढायचा असल्याचे सांगत राज ठाकरे यांना महत्त्वाचे निर्देश दिले. “तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यायची गरजही लागणार नाही,” असे कोर्टाने यावेळी म्हटले.
२००८ मध्ये झालेल्या रेल्वे भरती बोर्डाच्या परीक्षेदरम्यान मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी कल्याण कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. आता हा खटला आता ठाणे कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. यावेळी न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांच्या दालनात ही सुनावणी सुरू झाली. राज ठाकरे यांच्यासह या प्रकरणात सहभागी असलेले त्यांचे सात सह-आरोपी देखील कोर्टात उपस्थित होते. मनसेच्या वरिष्ठ फळीतील नेते नितीन सरदेसाई, अभिजीत पानसे आणि अविनाश जाधव हे देखील कोर्टात हजर होते.
या सुनावणी दरम्यान न्यायालयाने राज ठाकरे यांना थेट विचारणा केली, “तुम्हाला गुन्हा कबूल आहे का?” या प्रश्नावर राज ठाकरे यांनी कोणताही संभ्रम न ठेवता, “मला गुन्हा कबूल नाही,” असे स्पष्ट उत्तर दिले. राज ठाकरे यांनी गुन्हा कबूल नसल्याचे सांगितल्यानंतर, हे प्रकरण लवकरात लवकर निकाली काढण्याच्या दृष्टीने न्यायाधीशांनी सूचक टिप्पणी केली. न्यायमूर्ती अभिजीत कुलकर्णी यांनी राज ठाकरे यांना उद्देशून अत्यंत महत्त्वाचे विधान केले. तुम्ही सहकार्य करा, एक महिन्यात हे प्रकरण संपेल. तुम्हाला यापुढे यायची गरजही लागणार नाही.” तसेच, सहकार्य मिळाल्यास हे प्रकरण जून महिन्यापर्यंत निश्चितपणे संपवता येईल, असे कोर्टाने नमूद केले. यावेळी राज ठाकरे यांच्या कायदेशीर बाजूचे प्रतिनिधित्व ॲड. सयाजी नांगरे आणि ॲड. राजेंद्र शिरोडकर यांनी केले.
न्यायालयाने एका महिन्याची डेडलाइन देत हे प्रकरण संपवण्याची तयारी दाखवल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे यांच्यासाठी ही सुनावणी महत्त्वपूर्ण ठरली आहे. कोर्टाच्या या निर्देशानंतर या प्रकरणातील पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर दाखल असलेला हा खटला सुमारे १७ वर्षांपूर्वीचा आहे. २००८ मध्ये उत्तर भारतीयांसाठी रेल्वे भरती मंडळाची परीक्षा मुंबई आणि महाराष्ट्रातील अन्य केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मराठी तरुणांच्या नोकरीच्या हक्कासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन केले होते. याच आंदोलनादरम्यान कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनच्या हद्दीत मारहाण आणि प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यासह अनेक मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला हा खटला कल्याण कोर्टात सुरू होता. पण आता तो ठाणे येथील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टाकडे वर्ग करण्यात आला आहे. याच जुन्या प्रकरणावर आज सुनावणी झाली.