“केलेले आरोप सिद्ध करुन दाखवा नाही तर राजकीय संन्यास घ्या”; ठाकरे गटाच्या नेत्याचं राणे यांना खुलं आव्हान

| Updated on: Feb 06, 2023 | 3:54 PM

मी पुन्हा एकदा नारायण राणे यांना जाहीर आव्हान देत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एन्रॉनच्या काळातील माझा ठेका सिद्ध करून दाखवा.

केलेले आरोप सिद्ध करुन दाखवा नाही तर राजकीय संन्यास घ्या; ठाकरे गटाच्या नेत्याचं राणे यांना खुलं आव्हान
File Photo
Image Credit source: tv 9 Marathi
Follow us on

रत्नागिरीः महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून शिंदे गट, भाजप आणि ठाकरे गट यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमकी उडत आहेत. कोकणातील विविध मुद्यांवरून राणे आणि ठाकरे गट एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. त्यातच भराडी देवीच्या येथील भाजपच्या सभेतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या राजन साळवी यांच्या वर टीका करत अनेक गंभीर आरोप केले होते. एन्रॉन प्रकल्पावरून राजन साळवी यांच्यावर गंभीर आरोपही करण्यात आले होते. त्या आरोपांना आमदार राजन साळवी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

ज्या नारायण राणे यांनी आपल्यावर एन्रॉन प्रकल्पावरून जे आरोप केले आहेत, ते आरोप बिनबुडाचे असून केंद्रीय मंत्री नारायण राणे वाढत्या वयासोबत तुम्ही काही गोष्टी विसरत चालला आहात असा टोला त्यांनी राणे यांना लगावला आहे.

ज्या एन्रॉन प्रकल्पावरून नारायण राणे माझ्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्या आरोपामध्ये कोणतेही तथ्य तर नाहीच मात्र जो एन्रॉनचा विषय तो 1990 ते 2000 मधील आहे. आणि 2009 सली मी आमदार झालो आहे. त्यामुळे याच्या अगोदर माझा एन्रॉन किंवा गुहागरचा कोणताही संबंध नव्हता.

त्यामुळे नारायण राणे हे जे आरोप करत आहेत. ते बिनबुडाचे असून वाढत्या वयामुळे नारायण राणे यांना सारं काही विस्मरण झाले आहे अशी खोचक टीका राजन साळवी यांनी केली आहे.

ज्या प्रमाणे नारायण राणे यांनी एन्रॉन प्रकल्पावरून माझ्यावर टीका केली आहे, आरोप केले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पा वेळी झालेल्या जाहीर सभेतूनसुद्धा नारायण राणे यांनी एन्रॉन प्रकल्पामध्ये माझा ठेका आहे असा आरोप केला होता. त्यांनी त्यावेळी केलेल्या टीकेनंतरही मी त्यांना प्रतिआव्हान दिलं होत.

त्यावेळी त्यांना सांगितले होतं की, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंदर्भात माझ्या कुटुंबीयांचा ठेका असल्याचा सिद्ध करा पण ते सिद्ध करू शकले नाहीत.

त्यावेळीही त्यांनी माझ्यावर केलेले आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा माझ्या आरोप केले आहेत.

त्यामुळे मी पुन्हा एकदा नारायण राणे यांना जाहीर आव्हान देत असल्याचे राजन साळवी यांनी म्हटले आहे. तुमच्यामध्ये हिम्मत असेल तर एन्रॉनच्या काळातील माझा ठेका सिद्ध करून दाखवा.

या संदर्भात त्यांनी जर माझ्याबाबत कोणतेही पुरावे दिले तर मी सर्व पदांचा राजीनामा देईन असं खुलं आव्हान त्यांनी नारायण राणे यांना दिले आहे.

माझ्यावर नारायण राणे यांनी जे आरोप केले आहेत, ते आरोप त्यानी सर्व यंत्रांचा वापर करूनही सिद्ध करुन दाखवावे असं आव्हान दिल्याने हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

मात्र नारायण राणे हे आरोप सिद्ध करू शकले नाहीत तर त्यांनीसुद्धा राजकीय संन्यास घ्यावा असा जोरदार टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.