
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात दिवंगत नेते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाविषयी धक्कादायक दावे केले होते. त्यांचा रोख हा उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. यावर ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी भाष्य केले होते. उद्धव ठाकरे इतके वाईट होते तर 2014 ला रामदास कदम यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? असा सवाल परब यांनी कदम यांना विचारला होता. याला आता रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे. ते काय म्हणाले ते जाणून घेऊयात.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, ‘अरे अनिल परब्या. मला मंत्रीपद दिलं ते पर्यावरण खातं दिलं. तेव्हा पर्यावरण खातं नव्हतं. इतिहासात हे खातं नव्हतं. मला काही तरी द्यायचं म्हणून दिलं. सुभाष देसाई आणि दिवाकर रावतेंना महामंडळ दिलं. मी महामंडळ मागायला गेलो मुख्यमंत्र्यांकडे. फडणवीस यांच्याकडे. तेव्हा फडणवीस म्हणाले, उद्धवजींनी सांगितलं रामदास भाईंना महामंडळ द्यायचं नाही. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो.’
पुढे बोलताना कदम म्हणाले की, ‘मी उद्धव ठाकरेंना विचारलं तर म्हणाले तुम्हाला देणार नाही. मी दाव्याने सांगतो. मला नामधारी केलं. माझ्या मुलाला तिकीट देत नव्हते. तेव्हा शेवटचं हत्यार काढलं. तेव्हा जबरदस्तीने तिकीट दिलं आणि योगेशला पाडण्याचा प्रयत्न केला. अनिल परब्या मला तुझ्या मालकानेच गुहागरला पाडलं. मी दापोली मागत होतो मग गुहागरच तिकीट का दिलं?’ असा सवालही कदम यांनी केला आहे.
अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करताना रामदास कदम म्हणाले की, ‘अनिल परब भाडखाऊ. त्याची लायकी नाही माझ्या पायाजवळ राहायची. हा मातोश्रीजवळ का आला. पक्ष फुटला. सर्व नेते बाहेर गेले. हा चमचा कारणीभूत आहे. याच्या विभागात त्याने किती लोकं निवडून दिले. त्याला फक्त चुगल्या करायच्या आवडतात. उद्धव ठाकरेंना असे लोक आवडतात. तो नीच आहे.’