धंगेकरांनी बाहेर काढलं 200 कोटींचं नवं प्रकरण, मुरलीधर मोहोळ यांच्यावरील नव्या आरोपाने खळबळ!

रविंद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आणि गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे. त्यांच्यामुळे सराकरचे 197 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा धंगेकर यांनी केलाय.

धंगेकरांनी बाहेर काढलं 200 कोटींचं नवं प्रकरण, मुरलीधर मोहोळ यांच्यावरील नव्या आरोपाने खळबळ!
murlidhar mohol and ravindra dhangekar
| Updated on: Oct 26, 2025 | 4:02 PM

Murlidhar Mohol And Ravindra Dhangekar : शिंदे गटाचे नेते तथा माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर नवा आणि खळबळजनक आरोप केला आहे. मोहोळ यांनी केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत बॉम्बे फ्लायिंग क्लबला देय असणारी रक्कम 200 कोटींहून फक्त 2.30 कोटींपर्यंत कमी केली. मोहोळ यांनी बॉम्बे फ्लायिंग क्लबवर दाखवलेल्या मेहेरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे तब्बल 197 कोटींचे नुकसान झाले, असा मोठा दावा धंगेकर यांनी केला. तसेच मोहोळ यांनी विशाल गोखले यांच्यामार्फत कोणत्या कामाची दलाली केली आहे? असा गंभीर सवालही उपस्थित केला आहे.

बॉम्बे फ्लायिंग क्लबचे प्रकरण समोर आणले

अगोदरच पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणामुळे मोहोळ अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर धंगेकर यांनी आता बॉम्बे फ्लायिंग क्लबचे प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणी आरोप करताना धंगेकर यांनी एक्स या समाजमाध्यमावर ट्विट केले आहे. यात त्यांनी आरोपांबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

धंगेकर यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

‘पुण्यातील जैन बोर्डिंग होस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या श्री. विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री श्री.मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही’ असा दावा धंगेकर यांनी केलाय.

प्रायव्हेट जेटचा मुद्दा आणला समोर

तसेच, केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वीदेखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचे निदर्शनास येत आहे. सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या श्री. विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेटदेखील उपलब्ध करून दिल्याचे निदर्शनास आले आहे, असा खळबळजनक आरोप धंगेकर यांनी केला.

2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आली

‘जुहू विमानतळावरून आपले ऑपरेशन्स चालवणाऱ्या बॉम्बे फ्लायिंग क्लबकडून एअरपोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) ला देय (भरणा) असलेल्या रकमेच्या वसुली ,थकबाकीबाबत लेखापरीक्षण अहवाल आणि अंतर्गत अंदाजांनुसार नमुद केल्याचे आढळून आले आहे. नियमानुसार क्लबकडून व्यावसायिक दरांनुसार शुल्क आकारले गेले असते, तर सुमारे एकूण थकबाकी ₹200 कोटींची वसुली करणे अपेक्षित होते. परंतु केंद्रीय राज्यमंत्र्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागामुळे हे प्रकरण केवळ ₹2.30 कोटींमध्ये तडजोड करण्यात आलेली असल्याचे दिसून येत आहे, असा मोठा आरोपही धंगेकर यांनी केलाय.

197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान

‘श्री.मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या केंद्रीय मंत्री पदाचा गैरवापर करत मुंबई फ्लाईंग क्लब वर दाखवलेल्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचे सुमारे 197 कोटी रुपयांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून ज्या क्लबला याचा फायदा मिळवून दिला त्या मुंबई फ्लाईंग क्लबने विशाल गोखले यांच्यासाठी प्रायव्हेट जेट पाठवले होते. यामागे नेमकी कोणत्या प्रकारच्या कामाची दलाली श्री. विशाल गोखले मार्फत केंद्रीय राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे हा तपासाचा विषय आहे,’ असे म्हणत याबाबत मुरलीधर मोहोळ यांनीच खुलासा करावा, असे आव्हान धंगेकर यांनी मोहोळ यांना केले आहे.

विशेष म्हणजे धंगेकर यांनी काही फोटो आणि एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. त्यामुळे या प्रकरणात मोहोळ नेमके काय स्पष्टीकरण देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.