मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंड, महायुतीची डोकेदुखी वाढली, निवडणुकांपूर्वीच…

राज्यात आता लवकरच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका होणार आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडीमधील घटक पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटात बंड, महायुतीची डोकेदुखी वाढली, निवडणुकांपूर्वीच...
Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 01, 2026 | 3:47 PM

राज्यात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त जागा आपल्याच वाट्याला याव्यात यासाठी महायुतीमधील घटक पक्षांचे प्रयत्न सुरू आहेत. पुणे पदवीधर आणि शिक्षक अशा दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. या दोन्ही जागा आमच्याच असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या दोन्ही मतदारसंघाबाबत मोठा दावा केला आहे. ही निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याची आमची तयारी आहे. परंतु वेळ पडली तर भाजप म्हणून देखील आम्ही या निवडणुकीला सामोरे जाऊ असं जयकुमार गोरे यांनी म्हटलं आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच निर्णय घेतील असंही त्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान दुसरीकडे पुण्याच्या पदवीधर मतदारसंघावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून तर शिक्षक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान एकीकडे पुणे मतदारसंघातील जागांचा तिढा कायम असतानाच आता अमरावतीमधून मोठी बातमी समोर आली आहे.

Loading...

शिवसेना शिंदे गटाचे नेते श्रीकांत देशपांडे यांनी अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पक्षाने  उमेदवारी नाकारली तरी माघार घेणार नाही, शिक्षक आघाडीकडून लढणारच, असं श्रीकांत देशपांडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच अमरावतीमध्ये आता बंडाचा झेंडा फडकवण्यात आला आहे. त्यामुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

मी माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून शिवसेनेत कार्यरत आहे. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर माझाच पहिला अधिकार आहे. म्हणूनच मी पहिला अर्ज पक्षाकडून तर दुसरा अपक्ष म्हणून दाखल केला आहे.  जर पक्षाने उमेदवारी नाकारली तरीही मी निवडणुकीतून माघार घेणार नाही, असं यावेळी देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

उमेदवारी मिळणे हा माझा हक्क आहे. ती मिळाली नाही तर शिक्षक आघाडी या संघटनेच्या बॅनरखाली निवडणूक लढवणार आहे. परंतु माघार घेणार नाही. शिक्षक मतदार अत्यंत सुज्ञ आहे, तो यावेळी ताकही फुंकून पिणार आहेत, असंही देशपांडे यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान श्रीकांत देशपांडे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे अमरावती शिक्षक मतदारसंघात आता महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. या बंडाचा फटका महायुतीच्या उमेदवाराला बसू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us