
अनेक वर्षांपासून राज्यातील महापालिका निवडणुका रखडल्या होत्या. शेवटी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया झाली आणि 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी झाली. राज्यात महापालिका निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजपा ठरला. भाजपाने अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवली. मात्र, असे असले तरीही आता महापाैर पदांसाठी रस्सीखेच सर्वत्रच बघायला मिळत आहे. भाजपा, शिवसेना शिंदे गटाने काही पालिकांवर युती म्हणून निवडणूक लढवली. अजित पवार गटाने महापालिका भाजपा आणि शिवसेना ठाकरे गटाची साथ सोडून चक्क शरद पवार यांच्या पक्षासोबत लढवली. मात्र, यादरम्यान अत्यंत मोठं अपयश अजित पवार गटाला मिळाले. पुण्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवानंतर अजित पवार यांनी मोठे विधान करत म्हटले की, जनतेने दिलेला काैल मान्य आहे. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीची आचारसहिंता लागली आहे.
यादरम्यान मुंबई महापालिकेचा महापाैर नक्की कोण होणार? यावरून तूफान चर्चा आहे. मुंबई महापालिकेवर सर्वात जास्त नगरसेवक हे भाजपाचे निवडून आले आहेत. त्यानंतर शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांचे. सर्वाधिक नगरसेवक भाजपाची निवडून आल्याने भाजपाचाच महापाैर होईल, असे सांगितले जात आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी थेट भाकरी फिरवत गेंम चेंज केल्याचे बघायला मिळत आहे.
भाजपाला शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या मदतीशिवाय मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणे कठीण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना शिवसेना शिंदे गटाची मदत ही घ्यावीच लागणार आहे. शिंदेंनी अडीच वर्ष भाजपाचा महापाैर होईल आणि अडीच वर्ष शिवसेना शिंदे गटाचा ही अट ठेवली आणि आपल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना 5 स्टार हॉटेलमध्ये फोडाफोडीच्या भीतीने ठेवले.
आता नुकताच मिळालेल्या माहितीनुसार, महापाैर निवडीच्या दरम्यान भाजपाने थेट शिवसेना ठाकरे गटासोबत संपर्क साधला आहे. महापाैरपदाच्या निवडीच्या प्रक्रियेत ठाकरे गटाचे 65 नगरसेवक गैरहजर राहणार असल्याचे सांगितले जात आहे. 2017 च्या महापाैर निवडीवेळी भाजपाने शिवसेना ठाकरे गटासाठी माघार घेतली होती. यावेळी ती भरपाई शिवसेनेकडून केली जाईल, असे सांगितले जात आहे आणि थेट शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक महापाैर निवडीवेळी गैरहजर राहतील. मात्र, अशी कोणत्याही प्रकारची चर्चा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झाली नसल्याचे स्पष्ट शब्दात भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.