सुप्रिया सुळे म्हणाल्या हे तर हास्यास्पद, पण आता रोहित पवारांच्या त्या बैठकीचे फोटो समोर; 100 पदाधिकारी…
Rohit Pawar Gupt Baithak : रोहित पवार यांच्या नागपूर दौऱ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. गुप्त बैठका झाल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी फेटाळला होता. मात्र, आता 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या बैठकांचे तपशील समोर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या कॉलेजमध्ये झालेल्या पहिल्या बैठकीत कोण उपस्थित होते?

सुप्रिया सुळे यांच्या नाराजीच्या चर्चांदरम्यान शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नागपूर दौऱ्याबाबत नवा खुलासा समोर आला आहे. रोहित पवार यांनी नागपुरात कोणतीही गुप्त बैठक घेतली नसल्याचा दावा सुप्रिया सुळे यांनी केला होता. मात्र, आता रोहित पवार यांनी 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान नागपूर आणि विदर्भात घेतलेल्या बैठकांचे पुरावे समोर आले आहेत. या बैठकांना राष्ट्रवादी काँग्रेसमधील विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सुमारे 100 जण उपस्थित होते. विशेष म्हणजे, पहिली बैठक माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कॉलेजमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.
अनिल देशमुखांच्या कॉलेजमध्ये पहिली बैठक
22 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता रोहित पवार यांच्या बैठकांना सुरुवात झाली. नागपूरमधील फेट्री गावातील अनिल देशमुख यांच्या एनआयटी कॉलेजमध्ये पहिली बैठक पार पडली. या बैठकीच्या स्टेजवर अनिल देशमुख, सलील देशमुख आणि पक्षाचे प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील उपस्थित होते.
विदर्भातील जिल्हानिहाय पदाधिकाऱ्यांशी चर्चा
रोहित पवार यांनी यानंतर विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठका घेतल्याची माहिती आहे. या बैठकांना माजी आमदार चरण वाघमारे, अतुल वांदिले यांच्यासह अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. विदर्भातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह जवळपास 100 जण या बैठकांमध्ये सहभागी झाले होते.
मोर्चाच्या तयारीसाठी प्रेझेंटेशन
या बैठकांमध्ये रोहित पवार यांच्या प्रस्तावित दौऱ्याचा मॅप दाखवण्यात आला. तसेच रोहित पवार यांच्या टीमकडून प्रेझेंटेशनही देण्यात आले. 4 ते 9 डिसेंबरदरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नागपुरात भव्य मोर्चा काढण्याच्या पार्श्वभूमीवर ही तयारी सुरू असल्याचे समजते.
सुप्रिया सुळेंनी गुप्त बैठकांचा दावा फेटाळला होता
दरम्यान, रोहित पवार यांच्या गुप्त बैठकांच्या वृत्तावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना हा दावा हास्यास्पद असल्याचे म्हटले होते. रोहित पवार काल नागपुरात नव्हते, असेही त्यांनी सांगितले. मात्र, आता 22 ते 24 नोव्हेंबरदरम्यान झालेल्या बैठकांचे तपशील आणि त्यांचे पुरावे समोर आल्याने या विषयाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.