तोंडाला कुलूप लावून बसायचं का? रोहित पवारांच्या नव्या ट्विटने खळबळ, सुनेत्रा पवारांचे नाव घेत…

पुण्यात भरदिवसा खून, गोळीबार आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असताना आम्ही तोंडाला कुलूप लावून बसायचं का? या गुन्हेगारीचा फटका पोलीस संरक्षणात फिरणाऱ्या नेत्यांना कधीच बसत नाही तर सामान्य माणसं याचे बळी ठरतात. त्यावर आम्ही बोलायचं नाही? असा सवाल रोहित पवार यांनी केला.

तोंडाला कुलूप लावून बसायचं का? रोहित पवारांच्या नव्या ट्विटने खळबळ, सुनेत्रा पवारांचे नाव घेत...
ROHIT PAWAR AND SUNETRA PAWAR
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 8:53 PM

Rohit Pawar : पुण्यात एका आरोपीवर न्यायालयाच्या आवारात कोयत्याने सपासप वार झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली. या घटनेचे धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेनंतर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा गंभीर झाला असल्याची टीका विरोधकांकडून केली जातेय. आमदार रोहित पवार यांनी तर पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावरच अप्रत्यक्षपणे टीका केली. त्या अजितदादांसारखं काम करत नाहीयेत. अजितदादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, असं मोठं विधान रोहित पवार यांनी केलं. त्यानंतर मोठा राजकीय वाद उफाळला. त्यानंतर रोहित पवार यांनी मी सुनेत्रा काकींच व्यक्तिगतरित्या माफी मागतो, असं सांगून वादावर पडता टाकण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला. दरम्यान, रोहित पवारांनी आता नवी भूमिका घेतली आहे. त्यांनी ट्विटरवर लिखित स्वरुपात आपली भूमिका मांडली असून त्यांनी गुन्हेगारीवर आम्हा बोलायचं नाही का असा सवाल करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पालकमंत्रिपदावर नव्याने भाष्य केलंय.

प्रशासनावर मजबूत कमांड असलेल्या अजितदादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. स्वतःचं वेगळं अस्तित्व प्रत्येक व्यक्ती निर्माण करु शकतो.. पण हा त्यांच्या कष्टाचा आणि जिद्दीचा विषय आहे. तसं अस्तित्व सुनेत्रा काकीही निर्माण करतील, याबाबत आमच्या मनात कोणतीही शंका नाही. पण दादा गेल्यानंतर पुणे आणि बारामतीत गुन्हेगारी ज्या वेगाने वाढली, त्यावर आम्ही बोलायचं नाही का? असा सवाल रोहित पवारांनी केलाय.

Loading...

कोणत्याही महिलांच्या क्षमतेबाबत आम्हाला तिळमात्र शंका नाही; देशाच्या सर्वात कणखर पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी होत्या, हे विसरून चालणार नाही. त्यामुळं सुनेत्रा काकींच्या क्षमतेवरही आमचा प्रश्न नाही. त्यामुळं एखाद्या पदावरील व्यक्तीवर जेंव्हा टीका केली जाते तेंव्हा ती लोकांच्या अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्या पदावर बसलेल्या पुरुषावर किंवा महिलेवर केलेली टीका नसते तर त्या पदावर केलेली टीका असते, हे आधी समजून घेतलं पाहिजे. शिवाय दादांच्या कामाची बरोबरीही कुणीच करू शकत नाही, हे सत्य नाही का? असाही रोखठोक प्रश्न रोहित पवारांनी केला.

याचाच फायदा उठवत भाजपने सुनेत्रा काकींचे पंख छाटण्याचं राजकारण केलं नाही का? आधी त्यांच्या पक्षाकडील अर्थखातं काढून घेतलं आणि आता त्यावर ब्र शब्दही काढत नाहीत, त्यावर देखील हे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत का? आज त्या पुण्याच्या पालकमंत्री जरूर आहेत, पण त्यांना पूर्ण अधिकार दिलेत का? नसतील दिले तर त्यावर देखील ही मंडळी आंदोलन करणार आहे का? असा खोचक सवाल रोहित पवारांनी आंदोलन करणाऱ्यांना केला.

पुण्याचे पोलीस आयुक्त हे मुख्यमंत्री आणि भाजप नेत्यांशिवाय कुणालाच जुमानत नाहीत, तर सत्तेतील इतर पक्षाच्या नेत्यांचं काय? आणि यामागील भाजपाचं राजकारण आंदोलन करणाऱ्या या मंडळींना समजणार आहे का? मी काहीही चुकीचं बोललो नाही, तरीही माझ्या बोलण्यामुळं सुनेत्रा काकींना वाईट वाटलं असेल तर मी कालच जाहीर माफी मागितली आणि सुनेत्रा काकींना पूर्ण ताकद देऊन ‘पालकमंत्र्यांचे आदेश पाळा’ असे सक्त निर्देश पोलीस आयुक्तांना द्यावेत, अशी स्पष्टपणे मागणी केली. मग यात सुनेत्रा काकींचा अवमान कुठं झाला? उलट त्यांना अधिकार मिळावेत म्हणून ही मागणी करणं चूक आहे का? असेही रोहित पवार यांनी विचारले.

पुण्यात भरदिवसा खून, गोळीबार आणि कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असताना आम्ही तोंडाला कुलूप लावून बसायचं का? या गुन्हेगारीचा फटका पोलीस संरक्षणात फिरणाऱ्या नेत्यांना कधीच बसत नाही तर सामान्य माणसं याचे बळी ठरतात. त्यावर आम्ही बोलायचं नाही? अंधभक्ती तुम्ही जरूर करा, पण चुकीच्या गोष्टींवर आम्ही आवाज उठवतच राहणार! कुणाचाही अवमान न करता जर पदावरील व्यक्तीला प्रश्न विचारणं गुन्हा असेल, तर आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी याचं उत्तर द्यावं, असं थेट आव्हान रोहित पवारांनी दिलं.

शेवटी, आंदोलन करणारे कार्यकर्ते हे दुसऱ्या पक्षाचे आहेत तरीही त्यांना माझी विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताच्या / घातपाताच्या चौकशीसाठी आणि पुण्याच्या रिंगरोडला दादांचं नाव देण्यासाठीही तुम्ही आंदोलन करा आणि यासाठी आम्ही ज्यावेळी आंदोलन करु त्यातही तुम्ही सहभागी व्हा, असं आवाहनही त्यांनी केलं. आता अजित पवार गटातून यावर काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us