रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून हादरा! शरद पवारांसोबत मतभेद असल्याचा पहिल्यांदा शिक्कामोर्तब
रोहित पवारांना स्वत:च्याच पक्षाकडून मोठा हादरा बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पदाधिकाऱ्यांना आंदोलनात न जाण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

आमदार रोहित पवार यांच्याकडून मागील अनेक महिन्यांपासून अजित पवार अपघात प्रकरणावरून सातत्याने महायुती सरकारवर गंभीर आरोप केले जात आहेत. मागील काही महिन्यात आंदोलन करून रोहित पवारांनी महायुती सरकारला पद्धतशीर घेरण्याचं काम केलंय. आता रोहित पवार यांनी नागपूरमध्ये ‘न्यायहक्क ट्रॅक्टर मोर्चा’ची हाक दिली आहे. परंतु या मोर्चाची सैन्यबळाची रसद तोडण्यात आल्याची बाब समोर आली आहे. शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना आंदोलनात न जाण्याचे आदेश दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित पवार यांच्या नागपुरातील आंदोलनाला पक्षातील सदस्य जाऊ नये, याची तजवीज शरद पवार गटाकडून घेतली आहे. विदर्भातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांना रोहित पवारांच्या आंदोलनात न जाण्याच्या सूचना वरिष्ठ नेत्यांनी दिल्या आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये विदर्भातील शहराध्यक्ष ग्रामीण, शहरी जिल्हाध्यक्षांची रविवारी बैठक घेण्यात आली. शेगाव ते बुटीबोरीमार्गे नागपूर विधान भवनावर मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय. यासंदर्भात रोहित पवारांची बैठक पार पडली. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्षांना वेगळ्याच सूचना दिल्या आहेत. केवळ प्रदेश कार्यालयातून सूचना प्राप्त होतील, त्याच पाळण्याच्या सूचना विदर्भातील ग्राऊंड लेव्हलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. रोहित पवारांच्या कोणत्याही चळवळीत किंवा आंदोलनात सहभागी होऊ नये, अशा सूचना शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट एनडीएसोबत केंद्र आणि राज्यात जाणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्याकडून सत्तेत होणार नसल्याचे स्पष्ट केले जात आहे. तर जर पक्ष सत्तेत सहभागी झाला तर पर्यायी मार्ग निवडणार असल्याची भूमिका देखील रोहित पवार यांनी स्पष्ट केली होती. त्यामुळे रोहित पवारांना डावलण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित पवार आता काय भूमिका घेणार, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. या निर्णयाने रोहित पवारांची पक्षाकडून कोंडी हात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे रोहित पवार हे वेगळा निर्णय घेणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.