मुंबईत भोजपुरी गाणी वाजल्यानंतर नाशिक रेल्वे स्थानकावर मोठी कारवाई; छठपूजेआधीच… अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये नेमकं घडलं काय?
Nashik railway station cash seizure : छठपूजेच्या पार्श्वभूमीवर नाशिक रोड रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विशेष तपासणीदरम्यान आरपीएफने मोठी कारवाई केली आहे. अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका संशयित तरुणाच्या बॅगेत तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड आढळली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं?

पवन येवले, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी : छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर विशेष तपासणी सुरू असतानाच नाशिक रोड रेल्वे स्थानकावर आरपीएफने मोठी कारवाई केली आहे. ऑपरेशन सतर्क अंतर्गत अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणाकडून तब्बल 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर बॅग घेऊन जाणाऱ्या या तरुणाला आरपीएफ जवानांनी संशयावरून रोखले. त्यानंतर बॅगेची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली.
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये आरपीएफची कारवाई
रेल्वे स्थानकांवर छठपूजेच्या पार्श्वभूमीवर विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे. याचदरम्यान ट्रेन क्रमांक 22112 अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये आरपीएफ जवानांना एक तरुण संशयास्पदरीत्या बॅग घेऊन जाताना दिसला. नाशिक रोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर जवानांनी त्याला थांबवले. त्यानंतर त्याच्याकडील बॅगेची तपासणी करण्यात आली.
बॅगेत 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा
तपासणीदरम्यान तरुणाच्या बॅगेत 500, 200 आणि 100 रुपयांच्या नोटा आढळल्या. या नोटांची मोजणी केली असता एकूण 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने आरपीएफ जवानांनी तरुणाकडे चौकशी केली.
रोकड कुठून आणली? तरुणाला देता आली नाही समाधानकारक माहिती
या तरुणाचे नाव संदीप बाळासाहेब भामरे असून तो मूळचा सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथील रहिवासी आहे. सध्या तो जळगावमधील भवानी पेठ येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे. बॅगेतील एवढी मोठी रोकड कुठून आणली, ती कोणाची आहे आणि तिच्या वाहतुकीचा उद्देश काय, याबाबत त्याला विचारणा करण्यात आली. मात्र, त्याला समाधानकारक माहिती देता आली नाही. तसेच रोकडसंदर्भात कोणतीही वैध कागदपत्रे तो सादर करू शकला नाही.
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर सुरू असलेल्या तपासणीदरम्यान ही मोठी कारवाई करण्यात आली. त्याच्याकडे अवघ्या एका बॅगेत जवळपास दीड कोटी रुपयांची रोकड आढळल्याने या प्रकरणाकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, मुंबईमध्ये काल रेल्वेस्टेशनवर भोजपुरी गाणी वाजवण्यात आली होती. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरणही तापलं आहे.