
स्वयंघोषित कॅप्टन, भोंदूबाबा अशोक खरात याला महिलेवर बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाली आणि अख्ख्या राज्यात खळबळ माजली. नाशिकमधील या भोंदूबाबाच्या कारनाम्यांची राज्यभरात चर्चा सुरू आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचे भोंदू खरात यांच्यासोबतचे काही फोटो, व्हिडीओ समोर आल्यावर त्यांच्यावर चहूकडून टीकेची झोड उठली. विरोधकांनी त्यांना घेरत चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी तर पत्रकार परिषद घेत चाकणकरांवर अनेक आरोप करत त्यांच्या अटकेची देखील मागणी केली. आरोपांची उठलेली राळ आणि सगळीकडून घेरले गेल्यानतंर अखेर रुपाली चाकणकर यांनी काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. माझ्या वैयक्तिक कारणाने मी स्वेच्छेने सदर पदाचा राजीनामा सादर करत आहे.
खरात याच्याशी असलेली जवळीक चाकणकरांना महागात पडली असून पदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र त्यांच्या या राजीनाम्यानंतरही चाकणकरांवर टीका होतच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे तसेच शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अँधारे यांनी सोशल मीडियावरून पुन्हा रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला आहे.
रोहिणी खडसेंचा थेट निशाणा
राज्य महिला आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल पोस्ट लिहीत त्यांना डिवचलं आहे. ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म असं त्यांनी एका पोस्टमध्ये लिहीलं असून त्यासोबत त्यांनी रुपाली चाकणकर आणि खरात यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
तर त्याच खाली त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. ‘ गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल !’ अशा शब्दांत त्यांनी चाकणकरांवर निशाणा साधला.
ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली !
शेवटी… कर्म pic.twitter.com/HaXIyG57M9— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2026
माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch… – असंही खडसे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.
गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल !
माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) March 20, 2026
सुषमा अंधारेंचीही टीका
तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधरे यांनीही सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट लिहीत चाकरकरांवर टीका केली आहे.
‘ चाकणकरांचा आणि नैतिकतेचा सुतराम संबंध नाही.
चाकणकरांना जर स्वेच्छेने ने राजीनामा द्यायचा असता तर तो त्यांनी एक वर्षापूर्वी जेव्हा हे प्रकरण त्यांच्या कानावर आलं तेव्हाच किंबहुना किमान तीन दिवस आधी तरी तो राजीनामा दिला असता चाकणकर शेवटच्या क्षणापर्यंत पद वाचवण्यासाठी धडपडत राहिल्या.
चाकणकरांना जरा जरी पश्चातापबुद्धी झाली असती तर त्या खरात ची अटक झाल्याबरोबर राजीनामा देऊन मोकळ्या झाल्या असत्या मुळात हा राजीनामा नाही ही हकालपट्टी आहे.
चाकणकरांनी शब्दाची मलमपट्टी करून उगाच केविलवाणी धडपड करू नये.
नुसता राजीनामा पुरेसा नाही. चाकणकरांवर गुन्हा दाखल करून त्यांना सह आरोपी करून आणि त्यांची अटक होणं जास्त गरजेचे आहे…’ असं अंधारे यांनी पोस्टमध्ये लिहीलं आहे.