
स्वतःला मर्चंट नेव्हीचा निवृत्त कॅप्टन सांगून आध्यात्मिक गुरुच्या वेषात महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात म्हणजेच कॅप्टन खरातचे नवनवीन कारनामे उघड होताना दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. त्यातच आता या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांचा एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे रुपाली चाकणकरांच्या अडचणीत आणखी वाढ होताना पाहायला मिळत आहे.
रुपाली चाकणकर यांच्या या नव्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये त्या वादग्रस्त भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात या खाली जमिनीवर बसून पाय धुताना दिसत आहे. यानंतर त्या भोंदूबाबा खरात याला गंध लावू त्याला ओवाळणी करताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ जुलै २०२१ मधील आहे.
श्रावणी सोमवारच्या निमित्ताने एका विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या पूजेदरम्यान रुपाली चाकणकर यांनी कॅप्टन अशोक खरात याचे पाय धुवून त्याचे पूजन केले होते. त्यावेळी रुपाली चाकणकर या खरात याच्या शिष्या असल्याचे बोलले जात होते. भोंदूगिरी आणि फसवणुकीच्या आरोपाखाली खरातला अटक झाल्यानंतर आता त्याचे एकामागून एक धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत. या प्रकारामुळे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची टीका आता चाकणकर यांच्यावर होत आहे.
अशोक खरात, ज्याला कॅप्टन खरात या नावाने ओळखले जाते, त्याने स्वतःला एक आध्यात्मिक गुरु म्हणून प्रस्थापित केले होते. मात्र, त्याच्यावर फसवणुकीचे गंभीर आरोप झाले. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अशोक खरातचे संबंध केवळ राजकीय नेत्यांशीच नव्हे, तर अनेक क्षेत्रांतील दिग्गजांशी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या आश्रमात आणि कार्यक्रमांत बड्या नेत्यांची हजेरी असायची, ज्याचा फायदा घेऊन त्याने आपले जाळे पसरवले होते.
दरम्यान या घटनेनंतर महिला आयोगासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे पाद्यपूजन करणे हे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या विरोधात असल्याची टीका होत आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून रुपाली चाकणकर यांना घेरले आहे. एकीकडे महिला सक्षमीकरणाच्या बाता मारणाऱ्या नेत्या भोंदूबाबांच्या चरणी कशा लीन होतात? असा सवाल उपस्थित केला जात आहे.खरातच्या अटकेनंतर त्याचे अनेक नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ समोर येत असल्याने राजकीय गोटात चिंतेचे वातावरण आहे.